पिंपरी पालिका आयुक्तांवर माजी महापौर भडकले...

पिंपरी पालिका आयुक्तांविरुद्ध (PCMC Commissioner) न्यायालयात जाण्याचा माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल (Yogesh Behl) यांनी दिला इशारा.
Vilash Lande, Rajesh Patil & Yogesh Behl
Vilash Lande, Rajesh Patil & Yogesh Behl Sarkarnama

पिंपरी : बोगस एफडीआर सादर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दीड डझन ठेकेदारांना आय़ुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांनी काळ्या यादीत टाकले. एवढेच नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारीही केली आहे. मात्र, अशीच बोगसगिरी करून पालिका रुग्णालयांना मनुष्यबळ पुरविण्याचे १४० कोटी रुपयांचे कंत्राट मिळविलेल्या ठेकेदाराविरुद्ध त्यांनी अशी कारवाई केली नाही. त्याला काळ्या यादीत न टाकता पाठीशी घातल्याने आयुक्तांविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल (Yogesh Behl) यांनी काल (ता.९ नोव्हेंबर) दिला. दरम्यान, पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) हिटलिस्टवर अगोदरच गेलेले आयुक्त प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्याही निशाण्यावर आता आले आहेत.

Vilash Lande, Rajesh Patil & Yogesh Behl
मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे, पार्थ पवारांचा सूचक इशारा

ऐन गणेशोत्सवात खोदकाम करून रहिवाशांची गैरसोय केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कासारवाडीतील नगरसेविका आशा शेडगे-धाडगुडे यांनी पालिका आयुक्त केबिनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्याबद्दल सरकारी कामात अडथळा आणला म्हणून शेडगेंसह दहा महिलांना ऐन गणेशोत्सवात काही दिवस पोलिस कोठडी व नंतर तुरुंगात काढावे लागले होते. त्यातून आयुक्त भाजपच्या आणखी रडारवर गेले. त्याअगोदरही पंतप्रधान आवास योजनेची सोडत त्यांनी ऐनवेळी रद्द केल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी, तर खुद्द महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनीच आयुक्त दालनाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त म्हणून आणलेल्या पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीनेच दंड थोपटले. बहल व राष्ट्रवादीचे माजी आमदार भोसरीचे विलास लांडे यांनी बोगसगिरी करून पालिका रुग्णालयाला मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका मिळविलेल्या श्री कृपा सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदार कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गेल्या महिन्यात 21 (ता.२१ऑक्टोवर) तारखेला केली होती. मात्र, त्याची दखलच न घेतल्याने भडकलेल्या बहल यांनी काल (ता.९ नोव्हेंबर) आयुक्तांना खरमरीत स्मरणपत्र देत त्यांच्याविरुद्ध पोलिस तसेच, न्यायालयात जाण्याचा इशारा आता दिला आहे.

Vilash Lande, Rajesh Patil & Yogesh Behl
पार्थ पवारांनी पुन्हा वेधले प्रशासनाचे लक्ष!

चार रुग्णालयांना वैद्यकीय कर्मचारी पुरविल्याचा अनुभवाचा बनावट दाखला देऊन श्री कृपा सर्व्हिसेस प्रा. लि. ने पिंपरी पालिकेच्या आठ रुग्णालयांना मेडीकल आणि पॅरा मेडिकल स्टाफ पुरविण्याचे कंत्राट मिळवले आहे. श्रीकृपासह तीन संस्थांना १४० कोटी रुपयांचा हा ठेका देण्यात आला आहे. या संस्थांत पालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधींची भागीदारी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केलेला आहे. तसेच बनावट अनुभव दाखल दिलेल्या ठेकेदाराला हे काम दिलेच कसे अशी विचारणाही त्यांनी केलेली आहे. तर, या ठेकेदाराच्या बोगसगिरीचे दस्ताऐवज देत त्याच्यावर कारवाईची मागणी बहल यांनी पत्रकारपरिषद घेऊन २१ ऑक्टोबरला केली होती.

आय़ुक्तांचा अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर वचक नसल्यानेच त्यांना कोणीही टिकली मारून जात आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. येत्या आठ दिवसात या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले नाही, तसेच त्याला मदत करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली नाही, तर न्यायालयात य़ाचिका दाखल केली जाईल, असा दम बहेल यांनी काल आयुक्तांना भरला आहे. तसेच, त्याविरुद्ध पोलिसांतही तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपची नेतेमंडळी आणि काही पालिका अधिकारी यांचे आर्थिक हित साधण्यासाठी हा गंभीर प्रकार झाकण्याचा प्रकार सुरु असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक करून मनुष्यबळ पुरविण्याचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळविलेल्या श्री कृपालाच बक्षीस म्हणून रस्ते सफाईचाही कोट्यवधींचा ठेका देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. या कंत्राटदाराने जे मनुष्यबळ पुरविले आहे, त्याबद्दलचे बिल देऊ नये तसेच, त्याच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला दुसरे काम देऊ नये अशी मागणी बहल यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com