शिरूर (जि. पुणे) : शिरूर (shirur)तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रमुख विरोधकांनी एकत्र मोट बांधत, तब्बल २५ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषविणारे, आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) व सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले आहे. मृत सभासदांच्या वारसांची नवीन मतदार म्हणून नोंद करण्याचा विषय तापविण्याचे नियोजन विरोधकांनी केले आहे. निवडणुकीसंबंधी सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांची मते आजमावण्यासाठी शुक्रवारी (ता. २७ मे) शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे दादा पाटील फराटे यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. ('Ghodganga' election: All parties will come together and fight against Ashok Pawar)
घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, घोडगंगाचे संचालक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, घोडगंगाचे माजी संचालक ॲड. सुरेश पलांडे व कैलास पाटील सोनवणे, भाजप किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर, 'पीएमआरडीए'चे संचालक प्रकाश गव्हाणे, युवा नेते राजेंद्र कोरेकर यांच्या उपस्थितीत आज (ता. २४ मे) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत घोडगंगा कारखाना निवडणुकीसंदर्भात सभासद मतदारांची मते जाणून घेऊन व्यूहरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला कारखाना वाचविण्यासाठी, तो पुन्हा उर्जितावस्थेत आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, सभासदांचे हित जपण्यासाठी आणि कामगारांना न्याय व त्यांच्या कष्टाचे योग्य दाम मिळवून देण्यासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून, पक्ष-संघटनांना मधे न आणता या निवडणुकीकडे बघत असल्याचे दादा पाटील फराटे व सुधीर फराटे यांनी सांगितले.
कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. मात्र, मृत सभासदांच्या वारसांची त्यांच्या जागी मतदार म्हणून गेल्या तीस वर्षांत नोंद झालेली नाही. स्वतःच्या मर्जीतील मृत सभासदांच्या वारसांची नोंद करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अनेक मृत सभासदांच्या वारसांना मात्र मतदानापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप दादा पाटील फराटे यांनी केला. मृत सभासदांच्या वारसांनी सभासदत्व मिळावे म्हणून अर्ज केले. वाट पाहून त्यातील काही अर्जदार सभासदांचाही मृत्यू झाला. आता त्यांच्या वारसांनी सभासदत्वासाठी अर्ज केले आहेत. तरीही हा गंभीर विषय हाताळण्यास सत्ताधारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे वीस टक्के मतदार सभासद मृत असताना आणि हा विषय मोठा असतानाही सत्ताधारी वर्गाकडून टोलवला जात असल्याचा आरोप सुधीर फराटे यांनी केला. कारखान्याची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यावर येत्या आठ जूनपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या कालावधीत मृत सभासदांच्या वारसांनी संबंधित सभासदाच्या मृत्यूचा दाखला व शेअरची प्रत आणि नवीन सभासद म्हणून कुणाच्या नावाची नोंद करायची, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अशी कागदपत्रे कृती समितीकडे द्यावीत. ती प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाद मागून त्यांची सभासद म्हणून नोंद करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे ॲड. सुरेश पलांडे यांनी सांगितले. ही कायदेशीर प्रक्रिया विनाशुल्क केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार
घोडगंगा कारखाना प्रचंड कर्जबाजारी, उसाला बाजारभाव देण्यात सर्वात मागे, डिस्टिलरी, को-जनरेशन हे प्रकल्प असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही. सर्व बाबतीत आर्थिक घोडेबाजार, २५ वर्षे एकाच व्यक्तीच्या हाती सत्तासूत्रे असून मनमानी कारभार कारभार केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
सर्वांना मतदानाचा हक्क मिळवून देणार
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत कुठलेही राजकारण न आणता सभासद आणि कामगारांना न्याय देण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवणार आहोत. मृत सभासदांच्या वारसदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव हाणून पाडताना सर्वांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करू, असे घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.