Ajit Pawar News : अजितदादा पालकमंत्री झाल्याने त्यांची राष्ट्रवादी जोमात, तर भाजप...

NCP News : राष्ट्रवादीचे आजी, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही आता सुखावले आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri : अपेक्षेनुसार अजित पवार हे काल (ता. ४) त्यांच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पुन्हा ते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री होताच त्यांची या पदी वर्णी लागणार ही चर्चा लगेच झाली होती. त्यावर काल शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी भाजपने दोन पावले मागे घेतली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते सुखावले, तर भाजपला चिंतेने ग्रासले आहे.

अजितदादा पालकमंत्री झाल्याने पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा विकास वेगाने होणार असून, रखडलेल्या प्रकल्पांना आता गती मिळेल, ही अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रतिक्रिया ही त्यांचा पक्ष जोमात आल्याचे सांगून जाते. तीच भावना त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. पुणेही त्याला अपवाद नाही.

कारण या दोन्ही ठिकाणी ते गतवेळी २०१७ मध्ये महापालिकेच्या सत्तेतून पायउतार झालेले आहेत. त्यांना ती पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी अजितदादांचे पालकमंत्रिपद हे कवचकुंडल त्यांना ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील रखडलेली कामे मार्गी लावून ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करून त्यांना श्रेय घेता येणार आहे.

Ajit Pawar News
Beed NCP News : शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून 15 लाखाची खंडणी

अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार याची कुणकुण पुणे जिल्हाच नाही, तर पिंपरी महापालिका प्रशासनालाही अगोदरच मिळाली होती. कारण काही दिवसांपूर्वी पालकमंत्री नसताना पिंपरीच्या दौऱ्यात अजित पवारांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन त्याची चुणूक दाखवली होती. अगोदरचे पालकमंत्री भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कामे लगेच मार्गी लागत नसल्याची राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. पूर्वी अजितदादा पालकमंत्री असताना मंजूर झालेली राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींची डीपीडीसीतील कामे नंतर पाटील आल्यानंतर निधीअभावी रखडली होती. त्यांना आता पुन्हा वेग मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही आता सुखावले आहेत.

दुसरीकडे आता आपल्या कामांना ब्रेक लागेल, तसेच आपण सुरू केलेल्या विकासकामांची उद्घाटने अजित पवार करून त्याचे श्रेय निवडणुकीत घेतील, अशी भीती पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुणे महापालिकेतील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांना भेडसावते आहे.

डीपीडीसीतील आपल्या मंजूर कामांना निधी न देऊन उट्टे काढले जाण्याची भीती भाजपला आता सतावत आहे. पिंपरी पालिकेतील गेल्या पाच वर्षांच्या भाजपच्या राजवटीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या प्रकरणांची चौकशी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागेल की काय ही चिंताही भाजपला लागली आहे. एकूणच अजितदादा पालकमंत्री झाल्याने त्यांची राष्ट्रवादी सुखावली असून, भाजप मात्र काहीशी चिंताग्रस्त झाली आहे.

Ajit Pawar News
Eknath Shinde News : विकासकामांना स्थगिती देऊन सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? जयंत पाटलांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com