
Traffic problems in Hinjewadi IT hub: राज्यातील महत्त्वाचे आयटी हब म्हणजे राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञान पार्क. हिंजवडी, माण, मारुंजी गावांच्या शिवारात मुहूर्तमेढ रोवलेले. या परिसराला खड्डे, पाण्याखाली गेलेले रस्ते, वाहतूक कोंडीने घेरले आहे. समस्या सुटत नसल्याने कंपन्या स्थलांतरित होण्याचा इशारा देत आहेत.
राजकारण्यांनी फारसे लक्ष न दिल्याने नागरिक व आयटीयन्सनी उपाययोजनांची दिशा ठरवली. सरकारपर्यंत ही मंडळी पोहोचली आणि प्रशासन हलले. हिंजवडीचे प्रश्न सुटू पाहत असल्याचे पाहून श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले.
सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या सीमेलगतच्या हिंजवडी, माण, मारुंजी या गावांच्या शिवारात तीन दशकांपूर्वी राजीव गांधी आयटी पार्कची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुमारे दोन हजार आठशे एकर क्षेत्राचा हा परिसर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेल्या या पार्कमध्ये आठशेपेक्षा अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत.
या भागात दररोज अडीच लाख कर्मचारी ये-जा करतात. मात्र, तिथे येण्या-जाण्यासाठी मुंबई-बंगळूर महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) भूमकर चौक आणि भुजबळ चौकातून दोन सोईस्कर मार्ग आहेत. ताथवडे व पुनावळे येथूनही मार्ग आहेत, मात्र ते अरुंद आणि अविकसित आहेत.
पुण्यातून हिंजवडीला जाण्यासाठी बालेवाडी येथून सर्वांत जवळचा मार्ग होऊ शकेल. त्यासाठी मुळा नदीवर पूलही उभारला आहे. हा जुना पांदण रस्ता आहे. मात्र, भूसंपादनाअभावी रस्ता विकसित केलेला नाही.
भुजबळ चौकापासूनच हिंजवडीच्या फेज थ्रीपर्यंतच्या एलिव्हेटेड मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातच वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे
हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन टप्प्यांत कंपन्या विस्तारल्या आहेत. यामध्ये सॉफ्टवेअर, उत्पादन, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल्स कंपन्यांचा समावेश आहे. अडीच-तीन दशकांची वाटचाल असलेल्या अर्थात युवावस्थेत पोहोचलेल्या या आयटी पार्कला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. रस्ते खराब आहेत.
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवून किंवा वळवून अनेकांनी भूखंडाचे ‘श्रीखंड’ चाखले आहे. समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या भागाला प्रशासनानेही गांभीर्याने घेतले नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हिंजवडीला सात मार्गांनी जोडले आहे. पुणे विमानतळापर्यंत थेट बससेवाही आहे. शिवाय, कंपनीच्या बस आणि खासगी वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते अखंड पळत आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. पुण्यातील शिवाजीनगर-बाणेर-वाकड मार्गे हिंजवडी असा हा २३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. त्यावर २३ स्थानके प्रस्तावित आहेत.
हिंजवडी, मान व मारुंजी या गावांचा कारभार ग्रामपंचायतींच्या हाती आहे. मात्र, या भागाचा समावेश ‘पीएमआरडीए’मध्ये झाला आहे. कंपन्यांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्लॉटिंग केले आहे. ग्रामपंचायतींवर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण आहे. काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, काही रस्ते एमआयडीसीकडे; तर काही रस्ते पीएमआरडीएकडे आहेत.
मेट्रोचे कामही पीएमआरडीएकडून सुरू आहे. वीजपुरवठ्यासाठी महावितरण व महापारेषण आहे. शिवाय, लगतचा भाग म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आहेत. पोलिस प्रशासन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आहे.
जलसंपदा विभागाकडून पवना व मुळशी धरणाच्या पाण्यावर परिसर अवलंबून आहे. या सर्व आस्थापना आपापल्या सोईनुसार कामे वा सेवा पुरवीत आहेत. त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी एकाच नियंत्रणाखाली यंत्रणा असायला हवी.
हिंजवडी आयटी पार्कचा समावेश भोर-वेल्हे विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात होतो. मात्र, हिंजवडीला लागून चिंचवड व पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा व पुणे लोकसभा मतदारसंघ आहे.
आयटी पार्कमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी व अधिकारी जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत राहायला आहेत. त्यामुळे हिंजवडीतील समस्यांबाबत आयटी फोरम वा नागरिक आपापल्या सोईनुसार लोकप्रतिनिधींना भेटत असतात. परिणामी, त्या सोडविण्यासाठी एकसूत्रता दिसत नाही.
हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती, पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर चर्चा झाली. आयटीयन्स शिष्टमंडळ मुंबईत गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
त्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘एमआयडीसी’ने योग्य समन्वयाने नियोजन करावे, उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत् आराखडा सादर करावा, असा आदेश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
आयटीयन्ससमवेतची मुंबईतील बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका रविवारी सकाळीच भेट देऊन हिंजवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर प्रशासन जागे झाले. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या पंधरा दिवसांत दोन वेळा बैठक घेऊन आढावा घेतला आहे.
#UnclogHinjawadiITPark ई-याचिकाकर्ते आणि त्यांच्या सदस्यांनी ५७ पानी अहवाल तयार केला आहे. वाहतूक कोंडीतून आयटी पार्कला मुक्त करण्यासाठी त्यांनी १०० पेक्षा जास्त ठिकाणांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या नोंदी घेतल्या आहेत. त्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या आहेत. पोर्टेबल सिग्नल, वाहतूक पोलिस किंवा वॉर्डनची नियुक्ती, दुभाजक बसवणे, काही चौकात प्रवेश बंद करणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवणे अशा उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सर्वच विभागाचे अधिकारी आता हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी कामाला लागले आहेत. उपाययोजना सुरू केल्या आहेत. मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. नजीकच्या काळात भूसंपादन होऊन रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लागेल.
त्याचे श्रेय घेण्यासाठी आता लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. अधिकाऱ्यांसमवेत बैठकी घेऊन व आयटीयन्सला सोबत घेऊन आपणच हिंजवडीच्या समस्या सोडवू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.
भुजबळ चौक व भूमकर चौकातून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण
ताथवडे व पुनावळे येथून मारुंजी मार्गे हिंजवडी जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण
बालेवाडी-महाळुंगे मार्गे हिंजवडी रस्त्याचे रुंदीकरण व भूसंपादन करून रस्त्याची निर्मिती
पिंपळे निलख, वाकड कस्पटे वस्तीपासून आणि बाणेर-बालेवाडी येथून मुळा नदीच्या कडेने हिंजवडीपर्यंत समांतर रस्त्यांची निर्मिती
‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित रिंगरोड हिंजवडीच्या बाहेरून जातो, तो त्वरित करणे
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम जलदगतीने करावी नैसर्गिक ओढे, नाल्यांचे प्रवाह बदलणाऱ्यांवर, ते बुजविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
वीजसमस्या सोडविण्यासाठी महावितरण व महापारेषण यांच्यात समन्वय राहावा, स्वतंत्र अतिउच्चदाब वीजवाहिनी केंद्र असावे
सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सक्षम करणे एकहाती समस्या सोडविण्यासाठी हिंजवडीसह लगतच्या सात गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करणे किंवा नागरिकांच्या मागणीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांचा समावेश करणे
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात
कस्पटे वस्ती ते हिंजवडी फेज ३पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करा म्हाळुंगे आयटी सिटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा.
रस्ते रुंदीकरणासाठी मोबदला देऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे मुंबई-बंगळूर महामार्गावर देहूरोड ते कात्रज दरम्यान प्रस्तावित एलिव्हेटेड मार्गाचे काम सहापदरी करावे
शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जाऊन गर्दी नियंत्रणात राहील.
रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषय दोन्ही ‘मनपा’ने प्राधान्याने मार्गी लावावा पाटील वस्ती ते बालेवाडी रोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रवाहासाठी नियोजन करावे सर्व कामांसाठी विभागीय आयुक्तांनी समन्वय करून बैठका द्याव्यात
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शनिवारी (ता. २६) पहाटे राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी-माणमधील विकासकामांची पाहणी केली. हिंजवडीचे सरपंच व बांधकाम व्यावसायिकांवर चिडून पवार म्हणाले, ‘हिंजवडीचे वाटोळे झाले. कंपन्या चालल्यात हिंजवडी आणि महाराष्ट्र सोडू. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या कामात आडवा येणाऱ्यावर थेट ३५३ नुसार गुन्हे दाखल करा.’’ हिंजवडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांचे रुंदीकरण, पावसाचे पाणी व अतिक्रमण, पुणे-हिंजवडी मेट्रो मार्गिका यांचा आढावा घेतला. त्यानंतर पीएमआरडीए कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन तातडीने हिंजवडीतील समस्या मार्गी लावण्याचा आदेश दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.