पिंपरी : गेल्या महिन्यात १४ तारखेला पिंपरी न्यायालयाने चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस ठाण्यातील विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यातील खटल्याचा दोन दिवसांत निकाल देऊन आरोपीला सहा महिन्याची शिक्षा सुनावली होती. त्याची पुनरावृत्ती शिवाजीनगर, पुणे (Pune) येथील न्यायालयात शनिवारी (ता.२९) झाली. तेथे पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या अशाच गुन्ह्यातील खटल्याचाही फक्त तीन दिवसांत निकाल आला व आरोपीला सहा महिने सक्तमजुरी आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. अशा जलद निकालांमुळे महिलांविषयक गुन्ह्यांना आळा व गुन्हेगारांना जरब बसणार असल्याचे पोलिस (Police) व वकिलांनी सांगितले.
आरोपीनी गुन्हा कबूल केला, तर न्यायालयाचे काम लवकर संपून जलद निकाल लागतो. जर, गुन्हा तथा आरोप कबूल केला नाही, तर खटला लांबतो. गेल्या महिन्यात पिंपरी न्यायालयाने दिलेल्या जलद निकालात आरोपीने गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे तो खटला वेगाने निकालात निघाला. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील आरोपीने आपला गुन्हा कबूल केला नव्हता. तरीही तो न रेंगाळता तत्पर त्याचा निकाल आला, हे विशेष. त्यात फिर्यादीच्या सात वर्षाच्या लहान मुलाची साक्ष निर्णायक ठरली.
समीर ऊर्फ नाना श्रीरंग जाधव (वय ३१, रा. साखरेवस्ती हिंजवडी) असे शिक्षा झालेल्या आरोपी हॉटेलचालकाचे नाव आहे. त्याचे श्रद्धा फूड कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. तेथे चपात्या लाटण्याचे काम करणाऱ्या २७ वर्षीय फिर्यादी विवाहित तरुणीचा जाधवने विनयभंग केला होता. त्याबाबतच्या खटल्यात शिवाजीनगर, पुणे येथील न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी हा निकाल दिला. या गुन्ह्याचा जलद तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे पीएसआय रविंद्र मुदळ यांनी अवघ्या ३६ तासात तपास करून जाधवविरुद्ध चार्जशीट दाखल केले होते.
सहाय्यक सरकारी अभियोक्ता विजयसिंह जाधव आणि न्या. डोलारे यांनीही न्यायालयीन कामकाज तेवढ्याच वेळेत शीघ्रतेने उरकून निकाल दिला. २४ तारखेच्या रात्री ही घटना घडली. त्याबाबत दुसऱ्या दिवशी २५ जानेवारीला गुन्हा नोंद झाला होता. त्याचा सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुदळ यांनी दीड दिवसात तपास संपवून, पुरावे गोळा करीत २७ तारखेला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याच दिवशी सरकारी अभियोक्ता जाधव यांनी साक्षीपुराव्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी आरोपीची बाजू ऐकण्यात आली. तर, तिसऱ्या दिवशी आज निकाल दिला गेला.अशाप्रकारे ३६ तासात तपास आणि ३६ तास न्यायालयीन कामकाज होऊन ७२ तासात निकाल लागला. दंड न भरल्यास आरोपीला एक महिना साधी कैद भोगावी लागणार आहे. दंड भरल्यास ती रक्कम अपिलाच्या कालावधीनंतर फिर्यादी तरुणीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
२४ तारखेच्या रात्री साडेदहा वाजता आरोपी हा फिर्यादीच्या घरी गेला. तू माझ्याबरोबर रहा, असे त्याने तिला धमकावले. पण, विवाहित असल्याने तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचा राग येऊन त्याने तिचा विनयभंग केला. यावेळी मदतीसाठी तिने आरडाओरडा करताच तिचा सात वर्षाचा मुलगा धावून आला. मात्र, घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितले, तर जीवे ठार मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेला होता. या घटनेमुळे घाबरून गेल्याने त्या रात्री या विवाहितेला झोप लागली नाही. त्यावर तब्येत बरी नसल्याचे कारण तिने पतीला दिले. दुसऱ्या दिवशी पतीने डॉक्टरकडे जाऊ असे म्हणताच तिने आदल्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.