Junnar Assembly Seat : गेल्या सव्वा वर्षात राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. परिणामी यावेळच्या विधानसभेला वारेमाप इच्छुक झाल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, याकरिता आघाडी आणि महायुतीलाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशी स्थिती उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये आताच स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणून तेथे या पेचावर आतापासून मार्ग काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी सुरू केले आहेत. (Latest Marathi News)
गेल्या सव्वा वर्षात दोन पक्षांचे चार पक्ष झाले. म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गट झाले. परिणामी इच्छुकही दुप्पट झाले. त्यात काही अभी नही तो कभी नही, या भूमिकेत असल्याने या वेळी मोठ्या बंडाळीचे संकेत आताच मिळाले आहेत. ती टाळण्यासाठी आणि फुटीमुळे विभागलेल्या ताकदीचा फटका बसू नये म्हणून मूळ शिवसेना व राष्ट्रवादी अधिक काळजी घेत आहे. कारण त्यांचे बहुतांश आमदार-खासदार दुसऱ्या गटात गेल्याने त्यांना पर्याय उभा करायचा आहे.
या वेळी इच्छुकांची मांदियाळी होणार असल्याने आघाडी नाही, तर युतीच्याही नेत्यांची उमेदवारी देताना कसरत होणार आहे. त्यामुळे फूट पडलेल्या राष्ट्रवादीने आतापासूनच चाचपणी आणि पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच त्यांचे प्रमुख शरद पवार हे महिना्भरातच पुन्हा जुन्नरचा दौरा येत्या दोन तारखेला करीत आहेत.
या मतदारसंघात उमेदवारीचा गोंधळ अधिक आहे. कारण तेथील त्यांचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तेथे शरद पवार राष्ट्रवादीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कारण बेनके हे अजित पवार गटाबरोबर जातील, असे त्यांना वाटते आहे. म्हणून ते तेथे बेनकेंना पर्याय शोधू लागली आहेत. त्यातून नव्या दमाचे सत्यशील शेरकर यांचे नाव त्यांच्यासमोर आहे. त्यांची शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच भेट घेतली आहे. आता पुन्हा ते घेणार आहेत.
शेरकर यांचे घराणे काँग्रेसला मानणारे आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीने त्यांना आघाडीकडून उमेदवारी देऊ केली, तरी ते काँग्रेस सोडणार का हा प्रश्न आहे. त्यावर त्यांनी 'वेट अॅन्ड वॉच' अशी प्रतिक्रिया 'सरकारनामा'ला देत आपली सव्वालाखाची झाकली मूठ तशीच ठेवली आहे. तर जुन्नरकर सांगतील, तशी बेनकेंची भूमिका आहे. त्यातून ते दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष लढतील, असे दिसून आले.
दुसरीकडे आघाडीपेक्षा इथे महायुतीत उमेदवारीचा मोठा पेच आहे. कारण तेथे भाजपकडून आशा बुचकेंनी आपण लढणारच असल्याचे सांगितले आहे. पण, आधी लोकसभा आणि मोदी हे आपले प्राधान्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जुन्नरमधील बारक्या पोराला विचारले, तरी ते मी लढणार हेच सांगेन, असा दांडगा विश्वास त्यांनी लढणार का, या प्रश्नावर व्यक्त केला.
तेथून माजी आमदार शरद सोनवणे हे युतीत शिंदे शिवसेनेकडून तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे त्यांचे सूचक विधान खूप काही सांगून गेले. शरद लेंडे, माऊली खंडागळे अशी आणखी काही नावे विधानसभा निवडणूक जवळ येताच जुन्नरच्या रेसमध्ये येणार असल्याने ती आणखी चुरशीची आणि लक्षवेधी होणार आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.