सोमेश्वरनगर (जि. पुणे) : विकासकामांच्या बाबतीत अजित पवार यांच्यासारखा नेता राज्यात दुसरा नाही. त्यामुळे इथून पुढे मी, माझी शेतकरी कृती समिती, काकडे गट कायमस्वरूपी अजितदादांच्या सोबत राहणार आहे, अशा भावना शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी व्यक्त केल्या. तसेच, सोमेश्वर कारखाना हा आपल्या प्रपंचाचा विषय आहे. चांगला भाव देऊन चांगले काम केले तर सोबत राहणार. चुकीचे काम केले तर मात्र शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेणार, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. (Kakade group in future will be with Ajit Pawar permanently : Satish Kakade)
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सोमेश्वर विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, नंदकुमार जगताप, संभाजी होळकर, प्रमोद काकडे, माणिक झेंडे आदी उपस्थित होते. मागील दोन निवडणुका राष्ट्रवादीशी कारखाना निवडणुकीत दोन हात करणाऱ्या शेतकरी कृती समितीने या वेळी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. कृती समितीच्या वतीने सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजित काकडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. याबाबत काकडे यांनी आपली भूमिका सभासदांसमोर मांडली.
ते म्हणाले, अजितदादांवरील विश्वासातूनच आमची युती झाली. यापुढेही आपण एकत्र काम करणार आहोत. परंतु उमेदवारीच्या बाबतीत निश्चित कृती समिती नाराज झाली आहे, यात दुमत असायचं कारण नाही. परंतु अजितदादांना पॅनेल तयार करताना काय अडचणी आल्या असतील, हे मी समजू शकतो. मीही त्या प्रक्रियेतून गेलेलो आहे. तसेच, शेतकऱ्यांना चार पैसे जादाचे मिळाले पाहिजेत. कारखानाही चांगला चालला पाहिजे. सभासदांसाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. या भूमिकेतून अजितदादांकडून निरोप आल्यानंतर आम्ही मुंबईला त्यांना भेटायला गेलो. कृती समितीच्या वतीने आम्ही आमची बाजू मांडली. अजितदादांनी घरातील एक उमेदवार द्या, अशी इच्छा व्यक्त केली. घरात दोन मुलं असल्यामुळे घरात चर्चा केल्यावर माझ्या मुलाचं नाव कळविलं.
बारामती तालुक्याचं, राज्याचं राजकारण पाहिलं तर अजित पवारांइतकी दुसरी कुणाचीही ताकद नाही. हे मी दोन वर्षांपूर्वी माझ्या गावात अजितदादांच्या उपस्थितही बोललोय, आजही बोलतोय. आम्ही फक्त विकासकामाला महत्व देतो. मी फक्त शेतकऱ्याचं हित पाहतो. मरेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबरच राहिल. शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर मी अजितदादांच्या कानावर घालीन. पण, संचालक मंडळाने ही वेळ आणू नये. कारखान्याला भाव चांगला दिला, शेतकऱ्यांना वागणूक चांगली दिली तर कारखान्याबाबतही मी तुमच्याबरोबर असेन. मला पदाची अपेक्षा राहणार नाही. पण, शेतकऱ्यांच्याबाबतीत तडजोड करणार नाही. माझा मुलगा संचालक मंडळात घेतल्याबद्दल दादांचे आभार. येणारं संचालक मंडळ चांगलं काम करेल. पण, त्यांची चूक झाली तर मात्र तडजोड नाही. अजित पवार हेही चूक करणाराला सुटी देत नाहीत, त्यामुळे काळजीचे कारण नाही, अशी स्तुतीही त्यांनी केली. तसेच, कारखान्याच्या निवडणुकीत सोमेश्वर विकास पॅनेलला ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करा. क्रॉस वोटींग करू नका, असे आवाहनही सतीश काकडे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.