Sharad Pawar : कसबा पेठ पोटनिवडणुकीची (Kasaba By Election) रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार प्रचार करीत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुरवातीपासून कसबा मतदार संघात विविध घडामोडी घडत आहेत.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणुक होत आहे. भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत.
पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असल्यामुळे प्रचारात सक्रिय नव्हते. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापटांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर काल (गुरुवारी) बापट हे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
आजारपणामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या गिरीश बापट यांनाही भाजपने प्रचारात उतरवले आहे. यावरुन भाजप गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ करत असल्याची टीका काल (गुरुवारी) राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली होती.
यावर आज शरद पवार म्हणाले, "गिरीश बापटांना प्रचारात आणणे, ही भाजपला गरज होती का, हे ठाऊक नाही. बापटांना मी भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे,"
बापट पुन्हा रुग्णालयात दाखल
गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रकृती अस्वस्थ असताना देखील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मुद्द्यावरून भावुक झाले. ज्यामुळे त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना गिरीश बापट यांचे हात थरथरत होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पूर्ण कल्पना होती,किंबहुना त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं’, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे.
फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत आज पत्रकारांनी पुन्हा शरद पवारांना प्रश्न विचारला. मात्र, आता यावर मी काही बोलणार नाही. मला देवेंद्र फडणीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांना त्या विधानावरुन फटकारले. पुण्यात आयोजित 'बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद' या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.