Pune : शिरूर लोकसभा मतदारसंघ ( Shirur Lok Sabha Election ) महायुतीत कोणाच्या वाट्याला जातो, हा तिढा अद्याप सुटला नाही. त्यातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पुणे 'म्हाडा'चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच आढळराव-पाटील हातात 'घड्याळ' बांधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आढळराव-पाटलांनी हातात 'घड्याळ' बांधलं, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे.
महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. अजूनही तो कायम आहे. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. मात्र, उरला प्रश्न तो शिरूरचा. सध्या तरी अजित पवारांना शिरूरमध्ये उमेदवार सापडला नाही. शिरूरसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. पण, काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी या मतदारसंघात चाचपणी केली. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी शिरूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी देखील लावली; पण पार्थ पवारांना अनुकूल असे वातावरण दिसलं नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवाय बारामतीतही घरचाच उमेदवार आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी द्यायची, लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, म्हणून पार्थ पवारांना सध्या तरी ब्रेक लावला आहे. दुसरीकडे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीच्या कारणानं आधीच लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचं स्ष्ट केलं आहे. त्यातून विलास लांडे यांचं नाव समोर आलं. पण, त्यांचाही मतदारसंघात फारसा प्रभाव पडेल, असं चित्र सध्या नाही.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना 'म्हाडा' अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण केली की काय? अशी चर्चा रंगली होती. मात्र, जुन्नर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव-पाटील हेच शिरूरमधून उमेदवार असतील, असं सांगितलं होतं. पण, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार, याबाबत संभ्रम होता.
अशातच आता मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आढळराव-पाटलांनी शिरूरच्या जागेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंबाबत अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव आढळराव-पाटील राष्ट्रवादीकडून लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आढळराव-पाटील दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आढळरावांनी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' हाती बांधलं तर मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे. तसेच, शिरूरमध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे अर्थात दोन 'राष्ट्रवादी'त थेट लढत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.