Pune News : बारामतीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी तह करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बारामतीसह माढा लोकसभेचीही लढत लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत घेऊन माढा लोकसभेची जागा देण्यावरती चर्चा सुरू आहे.
यापूर्वी याबाबत शरद पवार यांनीदेखील सूतोवाच केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महादेव जानकर यांच्या समवेत चर्चा केली असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी वाटाघाटी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे पुढील काळात महायुतीचे डोकेदुखी वाढणार आहे.
काही दिवसांपूर्वी बारामतीतील गोविंद बाग येथील निवासस्थानी पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वाटाघाटीची कल्पना दिली. पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीसोबत घेण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्यांची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली ताकद आहे. तसेच रासपचे महादेव जानकरसोबत आले तर त्यांचेदेखील स्वागत आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची माझी तयारी आहे, असे पवारांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, जितेंद्र आव्हाड यांच्या दोघांमध्ये माढा लोकसभा जागेबाबत चर्चा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघाची जागा महादेव जानकर यांना दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा पूर्ण झाली असून, येत्या दोन दिवसांत शरद पवार यांच्या समवेत महादेव जानकर भेटून चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या 17 तारखेला माढा मतदारसंघात "माढा विजय निर्धार" मेळाव्याचे आयोजन केले असून, या मेळाव्यातून आपण लोकसभा निडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचेही जानकरांनी स्पष्ट केले. आता महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी वाटाघाटी करताना पाहायला मिळतात, त्यामुळे पुढील काळात महायुतीचे डोकेदुखी वाढणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमध्ये महादेव जानकर (Mahadev Jankar) नाराज असल्याचे स्पष्ट आहे. जानकर हे महायुतीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत स्वत: महादेव जानकर हे माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. या दोन्ही मतदारसंघांत मी उमेदवारी अर्ज भरणार असून, या दोन्ही मतदारसंघांमधून सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. माढा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsinh Nimbalkar) विद्यमान खासदार आहेत, तर परभणी मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव (Sanjay jadhav) हे विद्यमान खासदार आहेत.
(Edited By : Sachin Waghmare)
R