Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आपल्या जाहीर भाषणामध्ये अजितदादांनी खासदार कोल्हे यांचा कडक शब्दात समाचार घेत लोकसभेत त्यांचा 'पराभव करणार म्हणजे करणारच,' असे जाहीर केले आहे. यामुळे आता खासदार कोल्हेदेखील चांगलेच 'ॲक्टिव्ह' झाले आहेत. त्यांनीदेखील मतदारांसह प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
हडपसर विधानसभेचे (Hadapsar Assembly) शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार महादेव बाबर यांची खासदार कोल्हे (MP Amol kolhe) यांनी नुकतीच भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. बाबर हे कट्टर शिवसैनिक असून हडपसर भागात त्यांचे वर्चस्व चांगले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी बाबर (Mahadev Babar) यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (LokSabha Election 2024)
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आठ महिन्यांपूर्वी महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन अजित पवार बाहेर पडले. आमचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा दावा करीत त्यांनी सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करीत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद त्यांच्याबरोबर आलेल्या सहकारी छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांना विविध मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी हे चांगले काम करीत असून येणाऱ्या काळातही तेच पंतप्रधान होतील, अशी भूमिका घेत त्यांनाच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करावे, असे आवाहन मतदारांना करण्यास सुरुवात केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मीच उमेदवारी दिली, पण त्यांनी कुठलेही काम केलं नाही. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर दीड ते दोन वर्षांतच ते राजीनामा देण्यास निघाले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कोल्हे यांचा पराभव करणारच, असेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर, शिरूर, तसेच अन्य विधानसभा मतदारसंघातील दौरे पवार यांनी वाढविले आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपेदेखील आता अजित पवार यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्याबरोबर हडपसर भागात झालेल्या विकासकामांची पाहणी करताना आमदार तुपे दिसून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही आठवड्या-दोन आठवड्यांपूर्वी हडपसर भागात जाऊन महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदार कोल्हेदेखील सतर्क झाले असून त्यांनीही गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे नेते, माजी आमदार महादेव बाबर यांची भेट झाली. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव, संघटनकौशल्य नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक असते. महाविकास आघाडी म्हणून सोबत प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. खासदार कोल्हे यांच्या मतदारसंघात हडपसर येत असल्याने ते नेहमीच या भागात येत असतात. आमची भेट अनौपचारिक अशी होती. या भेटीत विशेष काही राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे, आमचा त्यांना नेहमीच पाठिंबा असणार आहे. पक्षप्रमुखांकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करू, असे आमदार महादेव बाबर यांनी सांगितले.
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.