Shirur News : पुणे जिल्हा व त्यातही शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कारण तेथे त्यांचे सहापैकी चार आमदार आहेत. तरीही तेथे लोकसभेला त्यांना शिवसेनेतून उमेदवार आय़ात करावा लागला, याची मोठी चर्चा आहे. (Shirur Lok Sabha Election 2024)
दुभंगण्यापूर्वी एकसंध राष्ट्रवादीचासुद्धा पुणे जिल्हा बालेकिल्ला होता आणि आहे. कारण त्यांचे संस्थापक अध्यक्ष या जिल्ह्यातील आहेत. पक्ष फुटला, तरी जिल्ह्यात त्याची ताकद मोठी आहे. एकसंध पक्षाचे तेथे चारपैकी दोन खासदार आहेत, तर शिरूरला सहापैकी पाच आमदार आहेत. युतीसह आघाडीनेही या वेळी काही आमदारांचे प्रमोशन करीत त्यांना खासदारकीची संधी दिली. मात्र, शिरूर त्याला अपवाद राहिला. तेथे युतीतील राष्ट्रवादीने आपल्या सर्व चार मातब्बर आमदारांना लायक असूनही लोकसभेला संधी दिली नाही, याचे आश्चर्य आहे. एवढेच नाही, तर भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंसारख्या दमदार इच्छुकांनाही त्यांनी का डावलले याचे कुतूहल आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षात मातब्बर दावेदार असताना राष्ट्रवादीने शिरूरला आयात उमेदवार (शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील) दिला, त्यामागे फक्त अजित पवारांनी कोल्हेंना पराभूत करण्याचे दिलेले चॅलेंज असल्याचे दिसून आले आहे. कारण कोल्हेंच्या पराभवातून शरद पवारांचाही तो नैतिकदृष्ट्या होणार आहे. कारण कोल्हे हे त्यांचे फाइंड आहे. तसेच त्यांनी साथ सोडल्याने अजितदादांचा त्यांच्यावर डूख आहे. म्हणून त्यांचा पराभव करणे, हे मुख्य कारण उमेदवार आयात करण्यामागे आहे. आढळराव हे तीन वेळा शिरूरचे खासदार राहिलेले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तेच कोल्हेंचा पराभव करू शकतात, अशी खात्री पटल्याने अजितदादांनी आपले आमदार आणि मंत्र्यांनाही (दिलीप वळसे-पाटील) डावलून आढळरावांना तिकीट दिले आहे.
इतर ठिकाणी आमदार हे खासदारकीसाठी एका पायावर तयार असतात. पण शिरूरमध्ये ते दिसत नाही. कारण तेथील आमदारकीची व त्यातून मिळणाऱ्या मंत्रिपदाची सुभेदारी, वतनदारी अनेकांना सोडायची नाही. म्हणून आजारपणाचे कारण दिलीप वळसेंनी खासदारकी नको यासाठी दिले. त्यात सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडून येण्याची शक्यता असली, तरी त्यांनी ती आताच नाही, तर गेल्यावेळीही खासदारकीची संधी सोडलेली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील हेसुद्धा दिल्लीत जाण्यासाठी एकदम फिट आहेत. पण, त्यांनाही राज्यात मंत्री बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनीही खासदारकीत रस दाखवलेला नाही. (Lok Sabha)
दुसरीकडे पक्ष फुटल्यानंतर काहीकाळ कुंपणावर राहिल्याने जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि हडपसरचे चेतन तुपे यांना याबाबत पक्ष विचारेल, याची शक्यताच नव्हती. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे जरी तयारीत असले, तरी ते भाजपचे आहेत. राष्ट्रवादीकडून ते लढण्याची सुतराम शक्यता नव्हती व नाही. लांडे हे मागे खासदारकीला हरले असल्याने त्यांचा विचार या वेळी पुन्हा केला गेला नसावा. ते कोल्हेंविरुद्ध निवडून येतील की नाही, याविषयी अजितदादांना (Ajit Pawar) शंका वाटत असल्याने त्यांनी मोठा दावा करूनही त्यांना दिल्लीची संधी दिली गेली नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.