

Pune News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत त्यांनी काल घडलेल्या घडामोडींचा घटनाक्रम सांगितले.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सरकार सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आंदोलनापूर्वी देखील आम्ही बैठक बोलावली होती. चर्चा करून ज्या गोष्टी शक्य आहेत. त्या करू असं आम्ही सांगितलं होतं. त्याबाबत बच्चू कडू यांनी मान्यता देखील दिली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी मला अर्ध्या रात्री मेसेज पाठवला.
लोक जमा होतील आणि आम्ही त्याठिकाणी असणार नाही. यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही बैठकीला येणार नाही असं, बच्चू कडू यांनी कळवले. त्यामुळे ती बैठक आम्ही रद्द केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बच्चू कडू यांच्याशी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क साधला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी जे प्रश्न मांडले आहेत, ते अशा पद्धतीने सुटू शकत नाहीत. त्या प्रश्नांबाबत चर्चा करून त्याबाबतचा रोड मॅप तयार करावा लागेल. त्यामुळे त्यांना चर्चेचा निमंत्रण देखील दिलं आहे. आंदोलनाचा त्रास मोठ्या प्रमाणात लोकांना झाला आहे. रस्ते अडविल्यामुळे पेशंटला त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे माझं त्यांना आवाहन असेल की, त्यांनी चर्चा करावी. अशा प्रकारे लोकांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नये, असे फडणवीस म्हणाले.
अशा आंदोलनामध्ये हौशे नवशे लोक घुसतात. त्यामुळे अशा काही प्रवृत्ती शिरून त्या आंदोलनाला हिंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. अशा प्रकारचा कोणत्याही हिंसक प्रकार घडणार नाही याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच रेल रोको आणि बाकीच्या गोष्टी करू दिल्या जाणार नाहीत. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटींचं पॅकेज दिले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.