Uddhav Thackeray: शिवसैनिक हतबल; जिल्ह्यात एकाही जागेवर उमेदवार नाही !पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party Pune Politics: पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ (काही भाग) लोकसभा मतदारसंघातील २१ विधानसभा मतदारसंघात एकाही जागा मिळत नसल्याचे शिवसैनिक हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

गणेश कोरे

Pune News: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रचंड झुंज द्यावी लागत आहे.

जिल्ह्यातील पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ (काही भाग) लोकसभा मतदारसंघातील २१ विधानसभा मतदारसंघात एकाही जागा मिळत नसल्याचे शिवसैनिक हतबल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

पुणे जिल्ह्यात पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, वडगावशेरी मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र वडगावशेरीमध्ये महाविकास आघाडीने राष्ट्रवादीने प्रबळ दावा केला केल्याने शिवसेनेची पीछेहाट झाली आहे. तर कोथरूड मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा शिवसेनेकडून सुरू आहे. मात्र कोथरूड सारख्या भाजपाच्या तुल्यबळ मतदारसंघात शिवसेना कितपत लढत देऊ शकेल, असा प्रश्‍न आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : शिवसेनेची दुसरी अन् काँग्रेसची चौथी उमेदवारी यादी जाहीर!

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात. यामध्ये देखील तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झालेली दिसत आहे. मावळ मतदारसंघात शिवसेना फुटीच्या अगोदर दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे वर्चस्व होते. यानंतर या मतदारसंघावर सध्या शिवसेना (शिंदे गटाचे) श्रीरंग बारणे यांचे वर्चस्व आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र या ठिकाणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सचिन दोडके हे प्रबळ दावेदार असून, दोडके यांचा गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला होता. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने चुरस वाढली आहे. तर महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे चौथ्यांदा आपले नशीब अजमावत आहेत. मनसेने दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देत लढतीमध्ये रंगत आणली आहे. रमेश वांजळे यांच्या अकाली मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपाच्या भीमराव तापकीर यांना मते देत मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पारंपरिक आणि हक्काच्या असलेल्या जुन्नर, खेड-आळंदी, भोसरी आणि हडपसर मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र या ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रबळ दावे केल्याने या ठिकाणचे उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आलेले नाही. या मतदारसंघात शिवसेना आक्रमक झाली आहे. जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड आणि सुरेश भोर यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभेला शिवसेनेने प्रामाणिकपणे काम करत कोल्हे यांना विजयी केले. प्रचारा दरम्यान खासदार कोल्हे यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मानाचे पान दिले जाईल असा शब्द दिला होता. शिवसैनिक पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही असे म्हणत शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले होते. या दोन्ही वाक्यांची आठवण शिवसेनेने कोल्हे यांना करून दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अधिक पेटला आहे. खेड -आळंदीची जागा ठाकरे गटाला दिल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप घोषणा झालेली नाही.

जुन्नर शिवसेनेचा आज निर्धार मेळावा

खेड आणि जुन्नरसाठी आग्रही असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जुन्नरमध्ये रविवारी (ता. २७) निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. पहिला भगवा शिवनेरीवर मग विधानसभेवर अशी हाक देत, जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, सुरेश भोर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com