
Malegaon News :बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. अजित पवारच रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. कारखान्याचे अध्यक्ष होऊन कायापालट करू, असे त्यांनी दिलेले आश्वासन निर्णायक ठरल्याचे मानले जाते.
काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. खुद्द अजित पवारच या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरले होते, त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीत लागले होते.
उपमुख्यमंत्र्यांनी एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उतरावे का, असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत होते. निवडणुकीतील वातावरण चुरशीचे असताना, पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष स्वतः असू, असेही अजित पवार यांनी जाहीर केले आणि त्यांच्या या विधानावरच निवडणुकीचे वातावरण फिरल्याचे मानले जात आहे.
बारामतीजवळ असणारा माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यातील मोठ्या कारखान्यांपैकी एक असून, उच्चांकी दर देण्याची या कारखान्याची परंपरा आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक कायम चर्चेत असते. यंदाही अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीसाठी आठवडाभर वेळ दिला, त्यामुळेही राज्यभरात चर्चा झाली.
या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन तावरे ही गुरू-शिष्याची जोडी प्रारंभापासूनच अजित पवार यांच्या विरोधात होती. या दोघांनीही विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली, मात्र त्यात त्यांना अपयश आले. माळेगाव कारखान्याच्या एका निवडणुकीत चंद्रराव तावरे यांना अजित पवार यांच्या पॅनेलचा पराभव केला होता.
हा अपवाद वगळता नंतर मात्र अजित पवारांना पराभूत करण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे या निवडणुकीत तावरे गुरू-शिष्याच्या जोडीचा किती प्रभाव पडतो, याची उत्सुकता होता. यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी अजित पवारांकडून बरीच मंडळी आल्याचे चंद्रराव तावरे यांनी जाहीरपणे नावे घेऊनच सांगितले.
अजित पवार यांच्याकडून बिनविरोधचा विचार असला, तरी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना सभासद आपल्याच बाजूने कौल देतील, असा विश्वास असल्याने शेवटी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले. अर्थात निकालानंतर तावरे जोडगोळीचा हा विश्वास अजित पवारांच्या व्यूहरचनेने चुकीचा ठरविला हेच सिद्ध झाले.
एकीकडे अजित पवार यांनी सूक्ष्मनियोजनावर भर दिला. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते त्या प्रत्येक आयुधाचा त्यांनी वापर केला. तर, दुसरीकडे सभासद आपल्याच सोबत आहे, या असा आत्मविश्वास तावरे गुरू-शिष्याच्या जोडीकडे होता आणि त्याचा फटका त्यांना बसला. उपमुख्यमंत्री आहोत ही बाब बाजूला ठेवत एक उमेदवार व पॅनेलप्रमुख या नात्याने अजित पवार यांनी गावोगाव जाऊन प्रचार सभा घेतल्या, गाठीभेटी घेतल्या. नाराजांशी बोलून त्यांची नाराजी दूर केली, इतकेच नाही तर त्यांच्या ताब्यातील सर्वच संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीचे वाटप करून प्रत्येक मतदारापर्यंत आपली भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार स्वतः निवडणुकीत उतरतील, त्यानंतर स्वतःला अध्यक्ष घोषित करतील व या निवडणुकीत चार पॅनेल होतील, याचा अंदाजच तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलला आला नाही, असे म्हणावे लागेल. अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यावर आठवडाभर आधी स्वतःला अध्यक्ष घोषित करून विरोधकांच्या प्रचारातील हवाच काढून घेतल्याचे चित्र निर्माण झाले. त्यांनी प्रत्येक सभेत विकासाच्या मुद्द्यावर दिलेला भर, बारामतीचा केलेला कायापालट, ‘माळेगाव’साठीही भरीव निधीची ग्वाही, राज्यातील पहिल्या पाच साखर कारखान्यांच्या यादीत ‘माळेगाव’चे नाव समाविष्ट करण्याचा दिलेला शब्द, स्वतः खांद्यावर घेतलेली जबाबदारी हे मुद्दे सभासदांना अधिक जवळचे वाटले.
दुसरीकडे तावरे यांनी अजित पवार यांचे खासगी कारखाने, सहकार मोडीत काढण्याचा त्यांचा डाव, छत्रपती कारखान्याची अवस्था, कारखान्यावरील मोठे कर्ज, साखर भिजली यांसारख्या मुद्द्यांवर त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सभासदांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करत अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलवर विश्वास व्यक्त केला. चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता रंजन तावरे यांच्यासह उर्वरित १९ उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणाऱ्या काही सभासदांनी अजित पवार यांनी त्यांना सामावून घ्यावे, याचा प्रयत्न केला खरा, त्याला अपयश आल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी बळिराजा पॅनेल उभे करून लढत देण्याचा प्रयत्न केला. खासदार सुप्रिया सुळे व युवा नेते युगेंद्र पवार यांनी या पॅनेलसाठी दौरे केले, सभाही घेतल्या, प्रत्यक्षात त्यांनाही अपयशच आले. एक मात्र निश्चित बळिराजा पॅनेलच्या उमेदवारांमुळे कोणाला तरी फायदा झाला व कोणाला फटका बसला. आता नेमका फायदा कोणाचा व तोटा कोणाला झाला, हा संशोधनाचाच विषय आहे.
कारखाना कार्यक्षेत्रात तुलनेने फारशी ताकद नसलेल्या, पण विविध मुद्द्यांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या काही सभासदांनी दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत कष्टकरी शेतकरी पॅनेल उभे केले होते. या उमेदवारांनीही काही मते मिळविली आहेत. चार पॅनेल असल्याचा फायदा अजित पवारांना झाला, असे काही जाणकारांना वाटते.
अर्थात मताधिक्याचा विचार करता ही शक्यता धूसर आहे. अजित पवार यांच्या बारामतीतील ताकदीचा अंदाज चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना नव्हता, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तरीही सभासद आपल्या बाजूने कौल देतील, इतक्या वर्षांचे या कारखान्यातील काम विचारात घेत सभासद वेगळा निर्णय घेत आपल्या पाठीमागे उभे ठाकतील, हा त्यांचा अंदाज सभासदांनी साफ चुकीचा ठरवला, त्यांची गणिते चुकली.
लोकसभा निवडणुकीनंतर ताकही फुंकून प्यायचे, या न्यायाने अजित पवार यांनी विधानसभेची निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हाताळली. त्याच पद्धतीने माळेगावची निवडणूकही त्यांनी प्रतिष्ठेची करत एकहाती जिंकली. या निवडणुकीला हलक्यात घ्यायचे नाही, असे पहिल्या दिवसापासून ठरवत आठवडाभर बारामतीत तळ ठोकून सभासदांशी थेट संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत या कारखान्याचा कायापालट करू शकतो, हे सांगायला ते विसरले नाहीत. अजित पवारांची शैली बारामतीकरांना माहिती आहे, त्यामुळे स्वतः तेच अध्यक्ष असतील तर निश्चित कारखाना आणखी सुस्थितीत येईल, असा विचार करून यंदा सभासदांनी आपले मत त्यांच्या पारड्यात टाकल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे अजित पवारांशी पंगा नको या भूमिकेतून अनेक मोठ्या नेत्यांनी या निवडणुकीपासून चार हात लांब राहणेच पसंत केले. त्यांच्या रडारवर यायला नको याची काळजी विरोधातील नेत्यांनीही घेतली. स्वतः तेच उमेदवार व अध्यक्षपदाचेही उमेदवार असल्याने तर विरोधकांना नेहमीप्रमाणे फारशी रसद मिळाली नाही, असे बोलले जाते. माळेगावची निवडणूक अवघड आहे, असेच चित्र निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत बारामतीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी निवडणुकीपेक्षा बिनविरोध करण्यावर भर द्या, असा सल्ला अजित पवारांना दिला होता. एकदाच काय व्हायचे ते होऊन जाऊ द्या, कुणाची ताकद नेमकी किती, हे तरी बारामतीकरांनाही समजेल या भावनेतून अजित पवारांनी चार हात करण्याचा निश्चय केला आणि सर्वस्व पणाला लावत यश अक्षरशः खेचून आणले.
या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी कमालीचे कष्ट घेतले, पद प्रतिष्ठा बाजूला सारून उमेदवार या नात्याने विनंती करत मते मागितली, कारखान्याच्या चांगल्या भवितव्याचा शब्द देत विश्वास निर्माण करत अवघ्या एका आठवड्यात मतपरिवर्तन करत विजय प्राप्त केला. निवडणूक कशी जिंकायची असते, याचा अभ्यास कोणाला करायचा असेल तर त्यांनी या माळेगावच्या निवडणुकीचा जरूर अभ्यास करावा. मतदारांना कोणीही अजिबात गृहीत धरायचे नाही, हाच संदेश या निमित्ताने पुन्हा एकदा दिला गेला. वीस उमेदवारांचा पराभव ही कल्पनाही तावरे जोडगोळीने केलेली नव्हती. असे झाले तर राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा रंजन तावरे यांनी वापरलेली होती, मतदारांनी त्यांच्या वीस जणांना घरचा रस्ता दाखवत काहीही घडू शकते हेच सिद्ध करून दाखविले. बारामती तालुक्यावर आपली पकड किती मजबूत आहे, हे अजित पवार यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत अजित पवार यांनी स्वबळावर निवडणुका लढवीत यश संपादन करत आपली ताकद आहे, ही बाब दाखवून दिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून ती जिंकता येते हे माळेगावच्या निवडणुकीने पुन्हा समोर आले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून आपणही राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये मागे नाही, हेच अजित पवार यांनी सिद्ध केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.