
मंचर (पुणे) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीसाठी आज नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण जाहीर झाल्याने महाविकास आघाडी तसेच महायुती मधील राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहेत.
आरक्षण जाहीर होऊन लगेचच नगरपंचायत परिसरात वातावरण बदललेले दिसत आहे. काही कार्यकर्ते निराश झालेत, तर काही नव्या संधीची प्रतीक्षा करीत आहेत. नगरपंचायत निवडणुकीत या नव्या आरक्षणामुळे राजकीय खेळी अधिक गडद अन् रंगीबेरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर (ता.आंबेगाव) नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सहा महिन्यांपासून जोरदार तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर झालेल्या आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. या आरक्षणानुसार नगराध्यक्षपद इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओ.बी.सी.) राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून संपर्क वाढविलेल्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या सर्व तयारीवर पाणी पडल्याची चर्चा मंचरमध्ये होत आहे. मात्र, या बदलामुळे काही इच्छुक कार्यकर्त्यांनी रणनीती बदलत इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओ.बी.सी.) प्रमाणपत्र असलेल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. ही ‘सुवर्ण संधी’ आता काहींच्या पत्नींसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांसाठी आरक्षणाने एक जबरदस्त धक्का दिला आहे, तर पती राजांच्या पत्नींसाठी ही आरक्षण संधी असल्याने रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. मंचर नगरपंचायत निवडणुकीत कोणाची सत्ता येईल, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
नगराध्यक्षपदासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इच्छुकांनी जोरदार संपर्क मोहीम हाती घेतली होती. लग्न, साखरपुडा, वाढदिवस, दशक्रिया व विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न जोरात सुरु होते. या मोहिमेत शिवसेनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात, लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, राष्ट्रवादीचे सुनिल बाणखेले, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते, स्वप्निल बेंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजाराम बाणखेले, कॉंग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष राजू इनामदार यांचा समावेश होता.
मंचर नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने आता राजश्री दत्ता गांजाळे, मोनिका सुनिल बाणखेले, पल्लवी लक्ष्मण थोरात, मिरा बाणखेले, वंदना बाणखेले, अश्विनी शेटे व जागृती महाजन आदींची नावे चर्चेत आली आहेत. या महिलांना विविध पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांचे पूर्ण पाठबळ असून त्यांनी जोरदार प्रचार मोहिम हाती घेण्याचे नियोजन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.