मुंबई : हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंच्या (Hutatma Shivram Hari Rajguru) स्मारकाबाबत सरकार गंभीरपणे काम करत आहे. या अगोदरही निधी दिला आहे. पर्यटन विभागाने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मागील आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे. स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. (Martyr Rajguru's memorial to be finalized in two months: Mungantiwar's announcement)
या स्मारकाच्या कामाबाबतचा अहवाल दर अधिवेशनात पटलावर माहिती ठेवण्याची तरतूद करण्यात येईल. ज्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहेत, त्यांची नावे यात असतील. तसेच, जे अधिकारी या कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व सभागृहाने एकत्रित येऊन करावे, असेही मुनगंटीवार यांनी सूचविले.
हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते, अतुल भातखळकर यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुनंगटीवार यांनी उत्तर दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे स्मारक राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे उभारण्यात आले आहे. मात्र हे स्मारक आता दुर्लक्षित झाले आहे. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासंदर्भात त्या त्या राज्यात हुतात्मा दिवस साजरा केला जातो. पंजाबमध्ये शासकीय सुटी दिली जाते. हुतात्मा राजगुरुंच्या जयंतीनिमित्त बलिदान दिन साजरा करून शासकीय सुटी जाहीर करावी, अशी मागणी आमदार मोहिते यांनी केली.
हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळी उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार विशेष बजेट जाहीर करणार का, अशी विचारणाही त्यांनी लक्षवेधीद्वारे केली. अजित पवार यांनी जेवढा निधी दिला, तेवढाच मिळाला आहे. त्यानंतर निधी मिळालेला नाही, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
मोहितेंच्य प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाबाबतचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, मागील अडीच वर्षांत आपल्याला पुढे जात आले नाही. स्मारकाच्या आराखड्यात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. तसेच, आमदार मोहिते यांच्या सूचनांचा अंतर्भाव करत एक समिती स्थापन करून दोन महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा आराखड्यासंदर्भातील चर्चा करण्यात येईल. अंतिम आराखडा तयार करण्यात येईल. राजगुरुनगर हे ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम सरकार करेल.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, बलिदान दिन आणि जयंती हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळी साजरी करण्यासाठी सरकार निधी देणार का? मुनगंटीवार अर्थमंत्री असताना झालेल्या बैठकीत ८६ कोटी २५ लाखांचा आराखाडा तयार झाला होता. पण ते पैसे मिळाले नाहीत. आता त्या आराखड्याची किंमत १५० कोटी होते. विकास आराखड्यास निधी देऊन तो वितरीत करणार आहे. हुतात्मा राजगुरु यांच्या वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रीय स्मारकासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. पण, राष्ट्रीय स्मारकासाठीच्या ज्या तरतुदी आहेत. त्यात १९५८ चा जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार १९५८ च्या अगोदरच्या १०० वर्षांपूर्वीच्या ज्या वास्तू आहेत. त्याच राष्ट्रीय संरक्षित स्मारकात येतात. त्यामुळे सेवाग्राम, साबरमती हेसुद्धा राष्ट्रीय संरक्षित स्मारकात नाही.
राज्य सरकारने राजगुरुंच्या वाड्याला राज्य स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. विशेष बाब म्हणून केंद्राला विनंती केली तर आराखड्यात त्यांच्या अटी व शर्तींचा सामना आपल्याला करावा लागेल. त्यामुळे सभागृहाची तशी इच्छा असेल तर केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. पण, आराखड्यासाठी स्थानिक आमदारांची समिती स्थापन करण्यात येईल. सरकार या आराखड्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करेल, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.