
आयटी इंजिनिअर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या गँगला अद्दल घडवली आहे. सुरूवातीला गजा मारणे हा राजकीय नेत्यांचा लाडका असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे बोलले गेले. मात्र मोहोळ यांनी दम दिल्यानंतर पोलिसांना जाग आली. त्यानंतर आरोपींची धिंड काढण्यापासून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यापर्यंत पोलिसांनी धाडस दाखवले.
कोथरूडमधील आयटी इंजिनिअर देवेंद्र जोग 19 फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवरून घरी निघाले होते. शिवजयंतीच्या मिरवणुकींमुळे भेलकेनगर परिसरात रस्त्यावर गर्दी होती. या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करताना चार जणांनी जोग यांना लाथा बुक्क्यांनी व पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. याबाबत त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावेळीपर्यंत पोलिसांनी यातील तिघांना अटक करून केवळ मारहाणीचे कलम लावले होते.
त्यानंतर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या प्रकरणात लक्ष घातले. शहरात गुंडगिरी आणि गँगची दहशत चालून देणार नसल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. पोलीस डोळे बंद करून बसले आहेत का?' या भाषेत मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात गजा मारणे यालाही अटक करावी अशी मागणी होत होती. मात्र राजकारण्याचा लाडका असल्याने कारवाई केली जात नसल्याचे बोलले गेले.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जागे झाले आणि दोन दिवसात तपासाची चक्र फिरली. कारवाईला वेग आला. आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचे कलम दाखल झाले. मोबाईल ट्रेकिंग, ट्रैफिक कॅमेरे याद्वारे तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या गँगला अद्दल घडवली आहे.
पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात आतापर्यंत ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी बाब्या पवार पसार आहे. मात्र कोथरूड परिसरातील गजा मारणे टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत तिघा आरोपींची शास्त्रीनगर ते भेलकेनगर परिसरातून धिंड काढली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच काही दिवसांपूर्वी पोलिसांना फ्री हॅन्ड असल्याचे सांगत कायदा मोडणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड काढा असले सांगितले होते.
पोलिसांनी या प्रकरणात टोळी प्रमुख म्हणून गजा मारणेवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गजा मारणेचा शोध सुरू झाला. मात्र मारणे हाताला लागत नव्हता. त्यावेळी बस झाला चोर-पोलिसांचा खेळ, त्याला हजर व्हायला सांगा, असा इशारा देण्यात आला. त्यानुसार मारणे सोमवारी सायंकाळी सहा वाजता कार्यालयात हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करत चौथ्यांदा बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणी तिघा आरोपींसह गजा मारणे, त्याचा भाचा रूपेश मारणे आणि त्याच्या टोळीविरुद्ध 'मोक्का' अंतर्गतही कारवाई करण्यात आली. त्यासाठी कोथरूड पोलिसांनी कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पूर्तता केली. रूपेश मारणे आणि बाब्या पवारचा शोध घेत असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
पोलिसांनी मारणे टोळीच्या आर्थिक नाड्याही आवळण्याची तयारी केली आहे. त्यासाठी नोंदणी महानिरीक्षकांकडून टोळीतील सक्रिय गुंडांच्या मालमत्तांची माहिती 'डीडीआर' करून मागवण्यात आली आहे. गुन्हे शाखेणे मारणे टोळीशी संबंधित मुळशी आणि कोथरूडमधील 74 ठिकाणांची आणि घरांची झाडाझडती घेतली. शिवाय आरटीओकडून त्यांच्या वाहनांची माहिती मागविली आहे. महापालिकेकडून त्याच्या इमारतींच्या आराखड्याची माहिती मागवली असून, नियमबाह्य बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.