Pune News:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासह अशोक चव्हाणांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे.
या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आता अनेक काँग्रेसचे दिग्गज नेतेदेखील राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हेदेखील राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विश्वजित कदम म्हणाले, "सकाळपासून अनेक वृत्तवाहिन्यांवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त मी पाहिले आहे. काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून यामुळे मला वेदना झाल्या आहेत. मात्र, या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये मीदेखील माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे, अशा बातम्या दिल्या जात आहेत. मात्र, मला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे, की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ज्या पलूस कडेगावच्या नागरिकांनी माझ्या वडिलांना भरभरून प्रेम दिलं, साथ दिली त्याच नागरिकांना मला पलूस कडेगावची, सांगलीची आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना मी पलूस कडेगावच्या नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. त्यामुळे कोणीही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, असं कदम यांनी स्पष्ट केलं.
अशोक चव्हाण यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण कॉंग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, या चर्चेने जोर धरला आहे.
‘सरकारनामा’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ आमदार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामध्ये काही नावे प्राप्त झाली आहेत. वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार राजू पारवे, गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सेशराम कोरेटे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, मराठवाड्यातील अमर राजूरकर यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्र सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.