उत्तम कुटे
Pimpri Chinchwad : उद्योगनगरी,आयटीनगरी असूनही पिंपरी-चिंचवडमध्ये वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे. त्यामुळे उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फटका,तर बसतोच. त्याजोडीने रहिवाशांचेही विजेअभावी मोठे हाल होत आहेत. ही समस्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी हेरून बुधवारी (ता.२६) ती विधानसभेत मांडली. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवडलाही पुण्यासारखे महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.
जेमतेम पाच महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या अश्विनी जगताप(Ashwini Jagtap ) या नवख्या असूनही एखाद्या अनुभवी सदस्याप्रमाणे ते आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेत मांडत आहेत. सोमवारी (ता.२४) त्या पुरवणी मागण्यांवर बोलल्या. मंगळवारी त्यांनी औचित्याच्य़ा मुद्याव्दारे मुलभूत सोयीसुविधांसाठी झगडत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न उपस्थित केला. तर, बुधवारी याच आयुधाचा वापर करत त्यांनी चिंचवडच नाही, भोसरी,पिंपरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या वीजेच्या समस्येकडे सभागृहाचे म्हणजे सरकारचे लक्ष वेधले.
त्या मुंबईत विधानभवनात हा प्रश्न मांडत असताना इकडे पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा लपंडाव सुरुच होता. वीजसारखी ये-जा करत होती. गेल्या मार्च महिन्याच्या शेवटी भोसरी परिसर दीड दिवस अंधारात राहिल्याने आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) यांनी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयात धडक देत तेथील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत त्यांनाच `शॉक` दिला होता.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिंपरी चिंचवडकर त्रस्त झाले असल्याचे आमदार जगताप म्हणाल्या. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.सध्या शहरातील महावितरणची भोसरी आणि पिंपरी विभागीय कार्यालये ही पुण्यातील गणेशखिंड मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत. (Monsoon Session )
वाढत्या वीजग्राहकांची संख्या विचारात घेऊन शहराला तीन विभागीय कार्यालयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा तीन कार्यालयांसाठी मंडळ कार्यालय असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठीही ते पुण्यातील कसबा पेठ आणि गणेशखिंडच्या धर्तीवर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच शहरातील वीज यंत्रणेच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. पिंपरी-चिंचवडकरांना वीजेच्या समस्या सोडविण्याकरिता वारंवार पुणे येथील मंडल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.म्हणून शहरासाठी या कार्यालयाची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.