Pune News : महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच वैयक्तिक पातळीवर उमेदवारांकडून टीका टिपणींना सुरुवात झाली आहे. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या फोटो वापरण्यावरून सर्वप्रथम हे दोन्ही उमेदवार आमने सामने आल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील होते. शरद पवार यांच्या भेटीदरम्यान पवार यांनी प्रचार रणनीती बाबतचे धडे यावेळी रवींद्र धांगेकर यांना दिले.
धंगेकर म्हणाले, "आज होळी आहे. या होळीच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. शरद पवार यांचा देश पातळीवरती मोठं काम आहे. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे शरद पवार यांना भेटून मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. पुढील कालावधीमध्ये शरद पवार हे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुरलीधर मोहोळ यांनी काल पैलवानांची बैठक घेऊन पुढील कालावधीमध्ये या पैलवानांना प्रचारामध्ये उतरवण्याची रणनीती आखली आहे. या बाबत बोलताना धंगेकर म्हणाले, त्यांनी पैलवान उतरवले असले तरी आमच्याकडे जय बजरंग बलीचे क्षेत्र आहे. पैलवानकीची परंपरा ही आपल्या मातीची आहे. घराघरात एक पैलवान असायचा जो त्याच्या घराचं, गावाचं आणि शहराचं संरक्षण करायचा त्यामुळे पैलवान हा सगळ्यांचा असतो. त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी किती पैलवानांना अर्धा लिटर दूध पाजलं याचा हिशोब त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांनी बिल्डरांना दूध पाजले असून आमच्या गरीब पैलवानांना त्यांनी कधीही अर्धा लिटर दूध पाजलं नाही. पैलवान हे सर्वांचे असून ते कोणीही एका पक्षाशी बांधील नाहीत आणि त्यांनी जरी पैलवान आणले तरी आमच्याकडे वस्ताद आहेत, अशी टीका धंगेकर यांनी केली.
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बाबत बोलताना धंगेकर म्हणाले, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे लवकरच प्रचारात दिसतील. आबा बागुल यांची भेट घेणार असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पुढील काळात आबा बागुल हे माझ्यासाठी प्रचार करताना दिसतील आणि त्यांच्या भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बापट यांच्या फोटो वापरण्यावरून चाललेल्या वादावरती बोलताना धंगेकर म्हणाले, बापट साहेब यांना मोहोळ यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती. त्यांना किती छळलं आहे सगळ्यांना माहिती. गौरव बापट यांनी काल माध्यमांशी साधलेला संवाद याची स्क्रिप त्यांना भाजपाकडून देण्यात आली होती. निवडणुका आहेत म्हणून बापट कुटुंबीयांचा भाजपकडून वापर करण्यात येत असून नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील यावेळी धंगेकर यांनी केला.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.