Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्रात तर मागील दीड वर्षांतील नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हे याचे प्रमुख कारण आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकच पक्ष आपली ताकद राज्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षप्रवेश सोहळे जोरदार सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. यामुळे निश्चितच वेल्हे तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. ज्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वेल्हे तालुक्यात मनसेची ताकद मागील काही वर्षांमध्ये वाढल्याचे चित्र दिसत होते. २०१७ मध्ये मनसेचे वेल्हे मार्गासनी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार गोपाळ इंगुळकर यांचा अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झाला होता. तर येणार्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मनसेचे प्रबळ दावेदार असलेले इंगुळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तालुक्यात मनसेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी लोकसभा न लढवता महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने, तालुक्यातील मनसे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे. मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाळ इंगुळकर व कार्यकर्त्यांनी यांनी शनिवारी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. या प्रवेशामध्ये तालुक्याचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांचा मोठा वाटा असल्याचे समोर येत आहे.
यावेळी अजित पवार यांनी वेल्हे तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच, तालुक्यातील महत्त्वाची कामे मार्गी लागणार असल्याचे गोपाळ इंगुळकर यांनी सांगितले आणि भविष्यातील राजकारणासाठी व विकासकामांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँक संचालक रेवणनाथ दारवटकर, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ, तालुका अध्यक्ष किरण राऊत, युवक अध्यक्ष संदीप खुटवड, लव्हीचे सरपंच शंकर रेणुसे, विकास नलावडे,मनोज जगताप ,राजू गिरंजे,बाबू गोरड,विठ्ठल धरपाळे,संतोष डांगे, दत्ता साळुंके, महेश साळुंके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.