Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गेल्या काही दिवसांत जोरदार वेग आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी जाहीर प्रचार सभा, बाइक रॅली यासह पदयात्रा आणि मतदारांच्या भेटीगाठी यावर भर दिला जात आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या चारही लोकसभा मतदारसंघांत महायुती उमेदवार विजयी व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मोठ्या संख्येने मोदी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुणे शहर मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह मावळ मधून खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा घेत आहेत. रेसकोर्स मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, यासाठी भाजपसह महायुतीत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार ताकद लावली आहे. सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी शहरातील विविध भागात बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा ज्या रेसकोर्स मैदानावर होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एका तरुणाने लावलेला फ्लेक्स नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आयुष दीपक कांबळे या तरुणाने हे फ्लेक्स लावले आहेत. एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर, निर्यातबंदी असो महागाई असो, बेरोजगार असो, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याचा, मायमाऊलीचा, युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. तसेच जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला, असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. मोदी यांची जाहीर सभा होत असलेल्या सभेच्या परिसरात हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, याकडे भाजपचे स्थानिक पदाधिकारी लक्ष देऊन ही माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवविणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
दरवर्षी हजारो युवक पदवीधर होऊन बाहेर पडत आहेत. मात्र त्यांना नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी अनेक कंपन्यांमध्ये अर्ज देखील केले जातात. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशी स्थिती असतानाही राज्य आणि केंद्र सराकर याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत मोदी सरकारने याकडे लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, यासाठी हे फ्लेक्स लावण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आणि अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करूनदेखील काहीही फायदा झाला नसल्याचे वक्तव्य तरूणाई कडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर रेसकोर्सच्या मैदाना जवळच्या परिसरात लावण्यात आलेले हे फ्लेक्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.