Nasrapur murder case : नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. याच प्रकरणाचा अंतिम फैसला आज (ता.२९) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात झाला.
यावेळी न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. तसंच नागरिकांचा संताप आणि राग पाहता न्यायलयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकालावेळी पीडित मुलीचे आई-वडील आणि नातेवाईक देखील कोर्टात हजर होते.
आरोपी भीमराव कांबळेला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) या प्रकरणात दोषी ठरविले होते. मात्र, अंतिम निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार आज हा निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे आज न्यायालय आरोपी कांबळेला फाशीची शिक्षा देणार की जन्मठेपची याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
अखेर न्यायालयाने आरोपीला फाशीची सुनावली. तसंच न्यायालयाने यावेळी ही केस दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही स्पष्ट केलं. तर अत्याचार आणि खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.
दरम्यान, या निकालाचं वाचन करताना न्यायालयाने पीडिता स्वरक्षणासाठी असमर्थ होती का याचाही विचार यावेळी केला. शिवाय अशा कट रचून हत्या आणि बलात्कार केला असेल तर या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. समाजावर घटनेचे दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांमध्येही फाशीचीच तरतूद असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. शिवाय आरोपीला फाशीची शिक्षासुद्धा कमी आहे, असंही न्यायाधीश यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी महामार्ग अडवले गेले. घटनेचे गांभीर्य पाहता पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि आरोपीला अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत १५ दिवसांत एक हजार २०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होते. विशेष न्यायालयाने २१ मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली. सरकारी पक्षाने मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यासह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यानंतर गुरुवारी (दि. २५) कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. तर आज न्यायालयाने आपला अंतिम निकाल जाहीर केला आहे.
अंतिम निकालाची सुनावणी करताना न्यायधीश नेमके काय म्हणाले?
- आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरी, पण फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही.
- कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यासाठी फाशीच्या शिक्षेचीच तरतुद.
- आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे.
- आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे, हत्येनंतरही त्याने लैंगिक अत्याचार सुरू ठेवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.