पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचे आमदार नसलेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्यासाठी तेथील जबाबदारी २०१९ मध्ये मोठ्या फरकाने निवडून आलेल्या पक्षाच्या दुसऱ्या आमदारांकडे सोपवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड, पुण्यातील खडकवासला व रायगड जिल्ह्यातील कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना तेथील प्रभारी करण्यात आले आहे. (NCP gave responsibility of Pimpri, Khadakwasala, Karjat constituencies to Sunil Shelke)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार पक्षवाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात कर्जत-जामखेडचे (जि. नगर) आमदार रोहित पवार यांच्याकडे पाच मतदारंसघ सोपवण्यात आले आहेत. त्यानंतर आमदार शेळकेंकडे तीन मतदारसंघ दिले आहेत. या मतदारसंघात २०२४ ला पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे, त्यासाठी तेथील पक्षाच्या उमेदवारांशी समन्वय ठेवून या मतदारसंघाचे वारंवार दौरे करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.
संबंधित मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन बूथबांधणीद्वारे पक्षसंघटना बळकट व मजबूत करण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी या प्रभारींना देण्यात आली आहे. मतदारसंघात असलेले पक्षातील गटतट संपवून तेथील प्रभावी व्यक्तींना पक्षात आणण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या जोडीने आगामी जिल्हा परिषद ,तालुका पंचायत, नगरपालिका व महापालिका निवडणुकीचीही पूर्वतयारी करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे मावळच्या आमदारांचे आता पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुणे शहराचेही दौरे वाढणार आहेत. परिणामी पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकीत त्यांचा महत्वाचा रोल असणार आहे.
मोठ्या फरकाने आपण निवडून आला असून मतदारसंघातही चांगले काम करीत असल्याने राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेने ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शेळके यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.आपला सहभाग महत्वाचा असून त्यानुसार वरिष्ठ पातळीवर नियोजन ठरणार असल्याचे त्यांना त्यात सांगण्यात आले आहे. शेळकेंकडे सोपवण्यात आलेल्या तीन मतदारसंघापैकी दोन ठिकाणी म्हणजे चिंचवड (लक्ष्मण जगताप) व खडकवासला (भीमराव तापकीर) येथे भाजपचे, तर कर्जतला (महेंद्र थोरवे) शिवसेनेचा आमदार आहे, त्यामुळे २०२४ मध्ये तेथे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले, तर त्याचे मानकरी मावळचे आमदार शेळके ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.