दौंड : रिक्षामुळे माझी ओळख निर्माण झाली. जे काही दिले ते रिक्षाने दिले आणि भरपूर दिले, असे कृतज्ञ भाव रिक्षाचालक असलेले दौंड नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संजय चितारे यांनी व्यक्त केले. नगरसेवक म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्णत्वास आला असला तरी पदाची हवा डोक्यात न गेल्याने त्यांनी पाच वर्षांत रिक्षा चालविणे बंद केलेले नाही, हे मात्र विशेष. (NCP gives opportunity to rickshaw driver Sanjay Chitare for post of Deputy Mayor's Daund)
दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संजय गणपत चितारे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक एकमधून ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. नगरपालिकेतील काही समित्यांवर काम केल्यानंतर पक्षाने त्यांना शेवटच्या वर्षात उपनगराध्यक्ष या पदावर काम करण्याची संधी दिली. पुढे निवडणुका असल्याने त्यांचा कालावधी कमी आहे. पण, पदाचे महत्व अबाधित आहे. साधी राहणी, कमी बोलणं पण मदतीसाठी तत्पर असणारे चितारे हे दौंड रेल्वे स्थानक परिसर, रिक्षा स्टॅण्ड, सिद्धार्थनगर, नगरपालिका, नवीन कॅार्ड लाइन रेल्वे स्थानक परिसरात सहजरित्या भेटत असतात.
संजय चितारे यांचे वडील रेल्वे खात्यातून मिस्त्री म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बारावी उत्तीर्ण संजय चितारे हे मागील २२ वर्षांपासून दौंड शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. छत्रपती शाहू महाराज रिक्षा स्टॅण्डचे ते सदस्य असून त्यांचे धाकटे बंधूदेखील रिक्षाचालक आहेत. त्यांची मुलगी बारावी उत्तीर्ण असून तिला डॅाक्टर व्हायचे आहे, तर मुलगा अकरावीत असून त्यास सिव्हिल इंजिनियर व्हायचे आहे. मुलांना चांगले व उच्च शिक्षण देण्याची त्यांची मनीषा आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक सदस्य इच्छुक असताना संजय चितारे यांची बिनविरोध वर्णी लावण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे व बादशहा शेख यांनी पुढाकार घेतला. राजकारणात ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनाच पद मिळते असा समज आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य रिक्षावाल्यास उपनगराध्यक्ष करून हा समज खोटा ठरविला आहे, असे ते अभिमानाने सांगतात.
सगळेच तसे नसतात
दिवसरात्र कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करणारा रिक्षावाला एक कष्टकरी घटक आहे. रात्री-अपरात्री मदतीला धावून येणारा रिक्षावाला आहे. रिक्षावाला वाईट नसतो, एखाद-दुसरा व्यक्ती वाईट असल्याने सगळेच तसे नसतात, असेही संजय चितारे यांनी रिक्षावाल्यांबाबत असलेल्या गैरसमजाबाबत आवर्जून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.