पिंपरी : मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात जोरदार बॅटिंग करत अनेक प्रश्न उपस्थित केले. अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळे रस्त्यांची कामे खराब दर्जाची होत असल्याने लगेचच खड्डे पडतात.
त्यामुळे त्याला जबाबदार धरून सबंधित रस्ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हाच दाखल करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी आज विधानसभेत केली. तसेच या सदोष रस्त्यांवरील अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्चही रस्त्याच्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, असे पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सामील होताना ते म्हणाले.
मावळ तालुक्यातील (जि.पुणे) नवीन रस्ते लगेच उखडून त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. त्यातही तळेगाव-चाकण महामार्गाची दुरवस्था झाल्याने तो अपघाती झाला आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) दुर्लक्ष झाले आहे.
लोणावळा येथील रस्तेही उखडल्याने 'मनसे'आणि भाजपने, तर लोणावळा नगरपरिदेवर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी मनसेने या एका रस्त्यावरील खड्यांत नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराचे प्रतिकात्मक चांद्रयान उतरविले. रस्ता समस्येवव मावळात आंदोलन सुरु असताना त्याचवेळी मुंबईत त्या बद्दल आमदार शेळकेंनी सरकारला धारेवर धरले.
तीन आठवड्यांतच नव्या रस्त्यांवर खड्डे पडल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जनतेचे करोडो रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यांचे ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत त्यांनी उघड केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल करण्याची व या सदोष रस्त्यांवरील अपघातात जखमी होणाऱ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च रस्ता ठेकेदाराकडून वसूल करण्याची मागणी त्यांनी हिरिरीने केली.
याबाबत तक्रार येताच तात्पुरती डागडुजी करून धूळफेक केली जाते, असे ते म्हणाले. दरम्यान, रस्ता दुरवस्थेवर ते आक्रमकतेने बोलत असताना सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण सभागृहात हजर नव्हते.
मावळात क्रीडासंकुल नसल्याने त्यासाठी जांभूळ येथील जागा देण्याची विनंती शेळकेंनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. गतवेळी तुम्ही या खात्याचे राज्यमंत्री होता, आता प्रमोशन मिळून कॅबिनेटमंत्री झाला आहात, अशी स्तुतीही त्यासाठी त्यांनी केली. मावळातील दुर्गम भागातील शाळकरी मुलांना वेळेत एसटी नसल्याने त्यांच्यासाठी सायकली व स्कूलबस घेण्य़ासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली.
वराळे, नानोली गावातील लोकांना होडीने ये जा करावी लागत असल्याने तेथे तसेच सांगवडे, मामूर्डी, कुंडमला येथेही पूलाची मागणी त्यांनी केली. सांस्कृतिक वारसा असलेल्या तळेगाव दाभाडे येथे नाट्यगृह उभारण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. लोणावळा शहरात टपऱ्या, शेडवरच कारवाई होते. मोठ्या हॉटेलांची शेड, अतिक्रमणावर ती का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.