Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या कामासंदर्भात आज (दि.२७) सकाळपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. पारनेरमधील बंधाऱ्यांच्या कामासंदर्भात ते उपोषणाला बसले होते. मात्र, जलसंधारण आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
पारनेर मतदारसंघातील ३० बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतरही या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. यावरून आमदार लंके यांनी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला होता. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमदार लंके यांनी पुण्यातील येरवडा येथील मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयासमोर हे उपोषण सुरु केलं होतं.
या सर्व कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे लेखी आश्वासन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार लंके यांना दिले. तसेच याबाबतचे पत्र दिल्यानंतरच लंकेंनी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. येत्या मंगळवारी (दि.२८ मार्च) या कामांच्या निविदा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारनेर तालुक्यातील २१ आणि नगर तालुक्यातील ९ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांसाठी मिळून एकूण २९ कोटी १९ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिली होती.
त्यानंतर स्थगिती उठविण्यासाठी लंकेंनी पाठपुरावा केला. स्थगिती उठविल्यानंतर देखील प्रत्यक्ष काम सुरु न झाल्याने लंकेंनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. अखेर आमदार निलेश लंके उपोषणाला बसताच प्रशासन तातडीने कामाला लागले आणि त्यांच्या मतदारसंघातील कामांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.