शहराध्यक्षांच्या मतदारसंघातच भाजपचे नाक कापण्याची राष्ट्रवादीची फिल्डींग

PMC Election : प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी असल्याच्या चर्चा
Jagdish Mulik
Jagdish Mulik Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : काल पुणे महापालिकेसाठी (Pune Municipal Corporation) प्रभाग रचना पार पडली. यात प्रथमदर्शनी ही रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग रचनेचीही काहीशी अशीच स्थिती आहे. त्यामुळे याभागात बहुमत असलेल्या भाजपच्या अनेक नगरसेवकांना नाविलाजास्तव राष्ट्रवादीची वाट पकडावी लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर उत्तर देताना केलेल्या कामाच्या जोरावर आमच्या सर्व जागा आम्ही राखू. उलट भाजपमध्ये येण्यासाठीच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत, असा दावा माजी आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केला आहे. तर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे सत्ता होती, मात्र एकही मोठा प्रकल्प भाजपला उभारता आला नाही. त्यामुळे मते मागण्यासाठी आता भाजपला नाक नाही, असा प्रतिहल्ला वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी भाजपवर चढवला आहे.

Jagdish Mulik
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली सेना शाखा सुरू करणारे, माजी खासदार बाबर यांचे निधन

गत पुणे महापालिका निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी मोठे कौशल्य पणाला लावले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडगाव शेरीला राष्ट्रवादीच्या हातून खेचत भाजपचे वर्चस्व निर्माण केले होते. मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. आता आमदार सुनिल टिंगरे राष्ट्रवादीचे आहेत. राज्यात सत्ताही राष्ट्रवादीची आहे. त्यात राष्ट्रवादीने अधिक जागा निवडून येण्यासाठी त्यांना अनुकूल मतदार याद्यांची बेरीज करून वार्ड रचना केल्याचे दिसत आहे. त्यापद्धतीनेच प्रभागांची मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपला आहे त्या जागा टिकवून ठेवण्यासाठीच यावेळी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

अनेक प्रभागांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, त्या ठिकाणी भाजपचे आजमितीला ४ ते ५ नगरसेवक आहेत. त्यातील तिघांना तिकीट मिळाले तरी उरलेल्या भाजपच्या विद्यमान नगरसेवकांना नाविलाजाने राष्ट्रवादीतून लढावे लागेल किंवा दुसऱ्या वॉर्डात जाऊन लढावे लागेल किंवा घरी बसावे लागेल. अशी परिस्थिती तयार झाली आहे.

अशी आहे वडगांव शेरीमधील प्रभाग रचना आणि स्थानिक राजकारण...

प्रभाग क्रमांक एक धानोरी विश्रांतवाडी असा असून तेथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता दोन जागा राखीव असतील. सध्या येथे भाजपचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचे अनिल टिंगरे त्यांच्या करता येथे पुरुष खुला जागा झाली तरच अनील टिंगरे तेथे लढतील. अन्यथा अनिल टिंगरे यांना प्रभाग क्रमांक दोन टिंगरेनगर संजय पार्क भागात लढण्यासाठी यावे लागेल. अशा स्थितीत विश्रांतवाडी धानोरीतील भाजपचा किल्ला ढासळू शकतो.

अनिल टिंगरे हे मूळचे अजितदादा गटाचे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे निकटवर्तीय असल्याने ते या वेळी नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मात्र अनिल टिंगरे राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले तर प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे प्रभाग क्रमांक दोन मधून लढायला इच्छुक आहेत. दलित मुस्लिम आणि टिंगरेनगरचे होमपीच यामुळे हा प्रभाग राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचे चित्र आहे. विमान नगर मधील भाजपचा एखादा नगरसेवक या भागात लढण्यासाठी जाऊ शकतो.

विमाननगर भाजपला अनुकूल आहे. मात्र आता या प्रभागाचे चार तुकडे झाले आहेत. विमाननगरला बहुतांश लोहगावचा परिसर जोडला गेला आहे. लोहगाव राष्ट्रवादीला मानणारा आहे. येथे एक जागा अनुसूचित जाती करता राखीव असणार आहे. आताचे चारही नगरसेवक विमाननगर भागातील आहेत. त्यामुळे लोहगावच्या जोरावर राष्ट्रवादी या प्रभागात पुढे जाऊ शकते.

वाघोली आणि खराडीचा युवान परिसर हा राष्ट्रवादी, शिवसेनेला मानणार आहे. तर खराडीच्या भागात माजी आमदार बापू पठारे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे बापू पठारे नेमकी काय भूमिका घेतात यावर या प्रभागाचे गणित अवलंबून असणार आहे. खराडी चंदननगर हा प्रभाग राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे एक नगरसेवक असलेल्या भागातून तयार झाला आहे. मागच्या निवडणुकीप्रमाणे इथे भाजप राष्ट्रवादीत काटे की टक्कर होईल. मात्र यावेळी माजी आमदार बापू पठारे भाजपसोबत आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत सर्वाधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Jagdish Mulik
'समय बलवान होता है' : अमित शहांचा तो फोटो दाखवत राणेंनी दिला शिवसेनेला इशारा

वडगाव शेरी प्रभाग क्रमांक सहा जसा बनला आहे त्यानुसार या भागातील भाजपचे पाच आणि राष्ट्रवादीचा एक असे सहा नगरसेवक आहेत. त्यापैकी तिघांना संधी मिळेल. त्यामुळे इतरांचा पत्ता आपोआप कट होईल किंवा त्यांना इतरत्र लढण्यासाठी जावे लागेल. या भागात मुळीक बंधूंचे वर्चस्व आहे. कोणत्याही परिस्थितीत मुळीक बंधू आपला बालेकिल्ला राखण्यासाठी प्रयत्न करतील. आमदार टिंगरे हे नारायण गलांडे यांच्या माध्यमातून मुळीक यांना शह देण्याचा प्रयत्न करतील.

कल्याणी नगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक सात आहे. सध्या या भागाचे प्रतिनिधित्व भाजपचे सहा नगरसेवक करीत आहेत. त्यातील तिघांना संधी मिळाल्यावर तिघांना दुसऱ्या पक्षात जाणे किंवा दुसऱ्या प्रभागात जाणे असे इतर मार्ग शोधावे लागतील.

प्रभाग क्रमांक आठ कळस फुलेनगर येथे आमदार सुनील टिंगरे स्वतः नगरसेवक आहेत. इतर तिघे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. आमदार टिंगरे यांचे त्यांच्यासोबत असलेले संबंध पाहता येथे पक्षांतर होईल अशी चर्चा आहे. येरवडा प्रभागात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे शिवसेना राष्ट्रवादीला वाट सोपी आहे. संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता काँग्रेस, मनसे, वंचित आणि एमआयएम आदी पक्षांना आपल्या मर्यादित संघटनात्मक फळीच्या जोरावर अस्तित्व दाखवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.

एकंदरितच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची रचना भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचा जीव टांगणीला लावणारी झाली आहे. त्यामुळे आता जगदीश मुळीक बालेकिल्ला कसा राखणार आणि सुनील टिंगरे हे जगदीश मुळीक यांच्या बालेकिल्ल्याला कसा सुरुंग लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com