Pune News: : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठी आहे; पण पक्षाचे कार्यालय खूपच छोटे आहे. तेही पक्ष बांधणीत म्हणजे, पवारसाहेबांच्या एका चाहत्याच्या खासगी जागेत थाटले गेल्याचे वास्तव सांगून, प्रशस्त तेही मोक्याच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षातील कारभाऱ्यांना नवे ऑफिस उघडायला भाग पाडले. दोघा 'पीए'ना बसवून ऑफिसचे वजन वाढविले.
त्याच अजितदादांचा ऑफिसमधून फोटो काढला गेला. तो काढला आणि त्यांच्याजागी दादांचे विरोधक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा फोटोही लावला. ज्या अजितदादांच्या रेट्यामुळे नवे ऑफिस निघाले, त्याच दादांचा फोटो राष्ट्रवादीतील पुण्याचे अध्यक्ष प्रशांत जगतापांनी जड अंत:करणाने काढला अन् भरलेल्या मनाने जयंत पाटलांचा फोटो लावला. पक्षाच्या 'प्रोटोकॉल' प्रमाणे फोटोंची रचना केल्याचे सांगून प्रशांत जगतापांनी मोजकेच उत्तर दिले.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे लाडके शहर. दोन्ही पवारांना मानणारा वर्ग याच जिल्ह्यात आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेत म्हणजे, १९९९ मध्ये संघटना बांधणीला वेग आला. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या मित्राच्या जागेत ऑफिस सुरू करण्यात आले. पक्षासाठीची पवारांची धडाडी पाहून ही जागा देण्यात आली होती. मात्र, महापालिकेत पंधरा वर्षे सत्ता, पुणे शहर जिल्ह्यात अनेक आमदार, एक खासदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हक्काचे आणि प्रशस्त ऑफिस उभारता आले नव्हते. ही बाब उघडपणे सांगून अजितदादांनी सत्ता भोगलेल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. त्यावरही राष्ट्रवादीला ना जागा ना ऑफिस झाले.
शेवटी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि शहराची धुरा येताच प्रशांत जगतापांनी ऑफिससाठी पुढाकार घेतला. अजितदादांना विश्वासात घेऊन जगतापांनी ऑफिस सुरू केले. साहजिकच शहर राष्ट्रवादीला नवा 'लूक' आला. नेते, पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा थाट वाढला. हे सगळे अजितदादांमुळे घडले.
पक्षाच्या जुन्या पध्दतीनुसार 'मेन हॉल' पक्षाध्यक्ष शरद पवार, अजितदादा, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा एकत्रित फोटो लावला. मात्र, पक्षातील फुटीनंतर दोन गटात पडलेल्या राष्ट्रवादीच्या या ऑफिसमध्ये रोजच अजितदादांचा फोटो दिसू लागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी द्विधा मन:स्थिती झाल्याचे बोलले जाते.
त्यातून शहराध्यक्ष या नात्याने जगतापांनी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांसोबत चर्चा करून अजितदादांचा फोटो काढला. 'तो काढला आनंद नव्हे वाईट वाटले. गेली २४ वर्षे दादांसोबत काम केले. त्याच दादांचा फोटो उतरावा लागल्याची भावना जगतापांनी 'सरकारनामा' कडे व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.