Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि याच पक्षाच्या बंडखोर गटाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. राज्यभरातील बहुतांशी नेते त्यांची भूमिका जाहीर करीत, आपापल्या गटाचे पारडे जड करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीतील महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही महिलांची मोट बांधत आहेत.
पण अजितदादांसह रुपाली चाकणकरांच्या पुण्यातच महिला आघाडीत थोडीशी ‘बिघाडी’ दिसत आहे. जुन्या राष्ट्रवादीत म्हणजे, शरद पवारांच्या नेतृत्वात महिलांचे नेतृत्व करताना पुण्यात महिला आघाडीची जबाबदारी सोपविलेल्या, रुपालीताईंच्या विश्वासू, त्यांच्या शब्दबाहेर न जाणाऱ्या,पक्षात सबंध राज्यासाठी रुपालीताईंचेच नेतृत्व कसे ‘उजवे’ हे पटवून सांगणाऱ्या मृणालिनी वाणी मात्र, बंडात रुपालीताईंचे काहीच ऐकत नसल्याचे चित्र आहे.
रुपालीताईंनी मूळ पक्ष सोडला; तरी मृणालिनी वाणींनी मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत राहून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रुपालीताईंसारखी ताकद अन्य कोणाकडून मिळण्याची फारशी शक्यता नसतानाही मृणालिनी वाणींनी लढण्याचा पवित्रा ठेवला आहे. पक्षातील बंडखोरीनंतर रुपालीताईची साथ सुटली, पक्ष वेगळा झाला. राजकीय घडोमोडीनंतर या दोघांची मैत्री कायम राहू शकते. परंतू, रुपालीताईंसारखे (Rupali chakankar ) पाठबळ इतर महिला नेत्यांकडून मिळण्याची शक्यता कमीच आहे.त्यामुळे मृणालिनी वाणींना संघर्ष करावा लागेल, हे ठाऊक असूनही त्या लढण्याच्याच तयारीत आहेत.
जुन्या राष्ट्रवादीत महिला आघाडीचे अध्यक्षपद येताच रुपाली चाकणकरांनी पुण्याच्या राजकारणात ‘कमांड’ बसवली. प्रदेशाची जबाबदारी असली; तरी त्या पुण्यात बारीक लक्ष ठेवून होत्या. विशेषत: महिला आघाडीत आपल्याच समर्थकांचा वरचष्मा त्यांना ठेवायचा होता. त्यातून पक्षांतर्गंत विरोधक, तेव्हाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष स्वाती पोकळेंना पदावर काढून, रुपालीताईंनी आपल्या निष्ठावान मृणालिनी वाणींना अध्यक्षपदावर बसवले. त्या काळात राज्यभर फिरणाऱ्या रुपालीताईंनी मृणालिनी वाणींचे हात बळकट करून आपला अजेंडा राबविला. त्यावरून अनेक महिला नेत्या, पदाधिकारी दुखावल्या; पण त्याकडे सोयीस्कपणे काणाडोळा करीत, रुपालीताई संघटनेत काम करीत राहिल्या.
पुण्यात त्यांनी महिला नेत्यांची स्वतंत्र फळी उभारली. पुढे ठाकरे सरकारच्या काळात महिला आयोगातून मंत्री झालेल्या रुपालीताईंनी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीमाना दिला. माजी आमदार विद्या चव्हाणांकडे प्रदेशाचे अध्यक्षपद आले. या काळात पुण्यातील महिला आघाडीत बदल होतील आणि मृणालिनी वाणींचे पद जाईल अशी शक्यताही होती. पण, काही झाले; तरी पुण्यातील वर्चस्वाला रुपालीताईंनी धक्काही लागू दिला नाही आणि मृणालिनी वाणी पदावर कायम राहिल्या.
मृणालिनी वाणींनीही नेटाने पदभार सांभाळला आणि आक्रमक राहिल्या. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड झाले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासू ठरलेल्या रुपालीताई पवारसाहेबांकडेच राहतील, असे अटकळ होती. पण भलतेच राजकारण घडले आणि बंडाच्या पहिल्या दोन दिवसांतच रुपालीताई अजितदांदांच्या गटात गेल्या. तिथे महिला आघाडीचे नेतृत्वही त्यांनी पुन्हा स्वत:कडे घेतले. बैठका, मेळावे घेतले.
पुण्यातील काही महिलांनी रुपालीताईंना साथ दिली. परंतू,ज्यांच्यासाठी पक्षांतर्गंत राजकारणाला तोंड दिले आणि पुण्याचे अध्यक्षपद दिले, त्या मृणालिनी वाणी रुपालीताईंकडे गेल्या नाहीत. त्यात मूळ पक्षात राहिल्या. उलटपक्षी, नव्या उमेदीने मृणालिनी वाणी संघटनेत काम करीत आहेत. पुढे महापालिकेच्या राजकारणात जाण्याचा मृणालिनी वाणींचा प्रयत्न आहे. या लढ्यात त्यांना रुपालीताईंची साथ मिळणार नाही, हे निश्चित आहे.