Pune News: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचे देवधर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. वागळे यांनी सोशल मीडियावर 'एका दंगेखोराने दुसर्या दंगेखोराला दिलेला पुरस्कार' अशा स्वरूपाचे लिखाण केले होते.
देवधर यांनी दिलेला तक्रारीनुसार विश्रामबाग पोलिसांनी यांच्या विरोधात 153 अ, 500 आणि 505 कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. वागळे यांची आज संध्याकाळी दांडेकर पूल येथे 'निर्भय बनो' आंदोलनाची सभा होणार आहे. या सभेसाठी वागळे यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी देवधर यांनी केली आहे. शहर भाजपनेदेखील वागळे यांच्या सभेला विरोध दर्शविला असून, ही सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला आहे. सभेच्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याचेदेखील भाजपने जाहीर केलेले आहे.
भाजपने दिलेला इशारा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून, इंडिया व महाविकास आघाडी हा प्रकार खपवून घेणार नाही, असे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केले आहे. साने गुरुजी स्मारक येथे ही सभा होणार असून, यामध्ये वागळे यांच्या बरोबरच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर अॅड. असिम सरोदे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी हे सहभागी होणार आहेत. भाजपने ही सभा उधळण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
वागळे यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पुणे पोलिसांत तक्रार केली आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे. माझ्या वक्तव्याविषयी मी ठाम आहे. मला अटक झाली तरी 'निर्भय बनो' आंदोलनाविषयी शुक्रवारी 9 फेब्रुवारीला सभा होणारच.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.