

Pune Farmer: राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि त्याचा उपयोग करून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाने युरोप आणि चीन अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
जगभरात विकसित होत असलेल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी हा अभ्यास दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. युरोप दौऱ्यात फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक पद्धतींची माहिती दिली जाणार आहे. तर चीन दौऱ्यात पीक उत्पादकता वाढविणारे तंत्रज्ञान, कृषी नवकल्पना आणि कृषी प्रदर्शनांचा अभ्यास करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ जमा करणे बंधनकारक राहणार असून बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावावर चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असणे, अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, वैध पासपोर्ट आणि आधार आवश्यक आहे. अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे असावे. तसेच तो शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेत नोकरीत नसावा. डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कंत्राटदार यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
याशिवाय यापूर्वी शासनाच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केला नसल्याचे तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आवश्यक स्वयंघोषणापत्र सादर करणेही अनिवार्य राहणार आहे. कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन जागतिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवावा आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.