पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक वसंत बोराटे यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षावर आरोपाच्या फैरी झाडत गेल्या बुधवारी (ता.१६ फेब्रुवारी) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेशही केला. पक्षातून बाहेर पडलेले व राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजपचे ते पहिलेच नगरसेवक ठऱले. तोच मार्ग चोखाळत व तोच आरोप करीत भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकानेही सोमवारी (ता.२१ फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे बोराटे यांना पाच वर्षात कुठल्याच पदावर न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडला. तर, आज राजीनामा दिलेल्या चंदा लोखंडे (Chanda Lokhande) यांना पक्षाने पद देऊनही त्यांनी पक्ष सोडला आहे, हे विशेष. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावरून त्या नुकत्याच पायउतार झालेल्या आहेत.
भाजप नेतृत्वाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचे चंदा लोखंडे यांनी तो दिल्यानंतर 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. येत्या शनिवारी (ता.२६ फेब्रवारी) पुण्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बोराटे हे पिंपरी-चिंचवडचे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या तर, लोखंडे या शहराचे दुसरे कारभारी भाजपचे शहरातील दुसरे आमदार चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातील आहेत. आमदार जगताप राहत असलेल्या पिंपळे गुरव या त्यांच्या बालेकिल्यातून (प्रभाग क्र.२९) लोखंडे या निवडून आलेल्या आहेत. त्यांचे पती व जगतापांचे विश्वासू असलेले माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी गेल्यावर्षी २१ ऑगस्टला कमळ सोडून हातावर घड्याळ बांधले होते. त्याचवेळी सौ. लोखंडेही राजीनामा देणार असल्याचे निश्चीत झाले होते. फक्त त्या आपली सभापती आणि नगरसेवकपदाची मुदत संपण्याची वाट पाहत होत्या.
१३ मार्चला या पालिका सभागृहाची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता तूर्त भाजपमधून नगरसेवकांचे राजीनामे सुरु झाले आहेत. लोखंडे यांच्यानंतर चिंचवडमधून आणखी एक नगरसेविका भाजपमधून बाहेर पडणार आहेत. त्यांचे पती सुद्धा माजी नगरसेवक आहेत. त्यांनीही गेल्यावर्षी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या नगरसेविकाही पतीच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत जाणार आहेत. तर, बोराटेनंतर पद न मिळालेले भोसरीतील आणखी एक भाजपचे नाराज नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते सुद्धा राष्ट्रवादीतच प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. ते अजितदादांना भेटलेले आहेत. इतरही काही भाजप नगरसेवकांनी अजितदादांच्या भेटी घेतल्या आहेत. पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे नगरसेवक राष्ट्रवादीत एकगठ्ठा प्रवेश करतील, असा तर्क आहे. परिणामी २०२२ साठी दिलेला शंभर प्लस नगरसेवकांचा नारा तथा उद्दिष्ट भाजप कसे गाठणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, बोराटेंच्या राजीनाम्यानंतर आमदार लांडगे यांची लगेचच प्रतिक्रिया आली होती. त्यामुळे आमदार जगताप यांच्या मतदारसंघातील नगरसेविकेच्या राजीनाम्यावर ते काही बोलतात का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.