पिंपरी : भाई म्हटले नाही म्हणून एका टोळक्याने चाकरमानी तरुणाला कुत्र्याप्रमाणे बिस्कीटे खायला लावून चंबड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) थेरगाव येथे घडली. धक्कादायक बाब म्हणजे सातजणांच्या या टोळीत तीन अल्पवयीन गुन्हेगार मुलेही आहेत. त्यातील तीन सज्ञान भाईं` च्या मुसक्या स्थानिक वाकड पोलिसांनी (Police) आवळल्या. नंतर त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांचे मुंडण करीत ते राहत असलेल्या भागातून त्यांची धिंड काढली. त्यांना सोमवारपर्यंत (ता. १ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या टोळीतील तीन अल्पवयीन भाईंनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील अनेक गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळत असून त्याबाबत पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
तु, मला भाई का म्हणाला नाहीस. मी या एरियाचा भाई आहे. माझ्या नादी कोणी लागले, तर त्याला मी सोडत नाही, असे म्हणत या टोळक्याने प्रथमेश राजेंद्र दबडे (वय २०, रा. ताथवडे) या तरुणाला कंबरेच्या चामडी पट्याने मारहाण केली होती. तसेच त्यांनी प्रथमेशला कुत्र्याची बिस्कीटे खायला भाग पाडले होते. दरम्यान, अशा भाईगिरी करणाऱ्या कुणाला सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी दिला आहे. असे भाईगिरी करणारे सुटणार नाहीत, असा मोठा संदेश त्यांनी या कडक कारवाईतून दिला आहे. अशा छोट्या घटनांतूनच पुढे मोठे गंभीर गुन्हे घडतात. त्यामुळे वेळीच त्यावर कारवाई करणे भाग असते, असे ते म्हणाले.
मात्र, या गुंडटोळीचा म्होरक्या गंग्या ऊर्फ रोहन वाघमारे (रा. १६ नंबर, थेरगाव) हा फरार झाला असून तो पोलिसांना सापडलेला नाही. २५ जानेवारीच्या रात्री साडेदहा वाजता थेरगाव येथील लॉंड्री चौकात ही घटना घडली. त्यानंतर मारहाण करतानाचा विडियो या टोळक्याने व्हायरल केला होता. अजित ऊर्फ आदित्य सुनील काटे (वय २०, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (वय २१, रा. काळाखडक, वाकड) आणि प्रशांत आठवले अशी अटक केलेल्या भाईगिरी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंग्या हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी शहरातून तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ती तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता.
घटनेच्या वेळी गंग्याने प्रथमेशला भेटायला बोलावले. त्यांची भेट झाल्यावर तू मला फोनवर बोलताना 'भाई … का म्हटले नाही' असे म्हणून अमानुष मारहाण केली. तसेच कुत्र्याप्रमाणे त्याला बिस्किटे खाण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे त्याची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला. यापूर्वीही काही गुंडांची दहशत संपवण्यासाठी ते राहत असलेल्या भागातून पोलिसांनी धिंड काढली होती. फक्त त्यांचे त्यावेळी मुंडन करण्यात आले नव्हते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.