PCMC News : पिंपरी-चिंचवडमधील १४ वर्षे जुना शास्तीकरमाफीचा सशर्त का होईना जीआर अखेर शुक्रवारी (ता. ३) राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे एक लाख अनधिकृत बांधकामधारकांचे साडेचारशे कोटी रुपये वाचले आहेत. त्यानंतर आता ४० वर्षे न मिळालेला साडेबारा टक्के जमीन परतावा मिळण्याकडे शहरवासियांचे डोळे लागले आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांच्या मानेवर गेले १४ वर्षे लटकत असलेली शास्ती या जिझिया कराची टांगती तलवार दूर करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाला नाईलाजाने का होईना घ्यावा लागला आहे. कारण या शास्तीमुळे मूळ मिळकतकरच नागरिक भरत नव्हते. परिणामी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न अडकून पडले होते. मालमत्ताकराची ही थकबाकी वसूल व्हावी, या उद्देशाने सरकारने शास्तीमाफीचा निर्णय घेतला. त्याचा साडेचार लाख रहिवाशांना फायदा होणार आहे.
शास्तीकराचा १४ वर्षे जुना प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता त्याहीपेक्षा खूप जुना म्हणजे ४० वर्षांचा साडेबारा टक्क्याचा जमीन परताव्याकडेही लक्ष लागले आहे. हा प्रश्न मार्गी लागून परतावा मिळेल, अशी आशा आता त्रस्त शहरवासियांना लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. शास्तीमाफीच्या घोषणेबरोबरच साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचे आश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने (State Government) हिवाळी अधिवेशनात दिले होते.
चिंचवड विधासनभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा या दोन्ही घोषणांची पूर्तता करू, असे गेल्या महिन्याच्या शेवटी सांगितले होते. त्यातील शास्तीमाफी मिळाल्याने आता फक्त साडेबारा टक्के बाकी राहिला आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेण्यात आल्या. त्यानंतर त्या प्रचंड मोठ्या दराने विकल्या. त्यातील साडेबारा टक्के परतावा त्या जमिनी देणाऱ्यांना सरकार देणार होते. त्यातील काहींना तो अद्याप देण्यात आला नव्हता.
शहरातील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांनी विधानसभेत त्याप्रश्नी आवाज उठवला होता. हा परतावा येत्या १५ दिवसांत दिला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात दिले होते. मात्र, तो दोन महिन्यानंतरही अद्याप दिला गेलेला नाही.
आता या आश्वासनाची पूर्तता किती दिवसात होते, की त्यासाठी पुन्हा एखाद्या निवडणुकीची वाट पहावी लागते, याकडे त्रस्त शेतकरी कुटुंबांचे डोळे लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.