पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC election 2022) आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार करून निवडणूक आयोगाला सादर केला. आता या आराखड्याची छाननी निवडणूक आयोग करणार आहे.
पुण्यात या आराखड्याची मोठी उत्सुकता आहे. येथे पालिकेत सत्ता भाजपची तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच नव्याने गावांचा समावेश पालिकेत झाला आहे. परिणामी मोठ्या उपनगरांतील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठा बदल झाला आहे. तसेच चारऐवजी तीनचा प्रभाग झाल्याने अनेक समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे येथे आपल्या सोयीने प्रभागरचना करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांवरही त्याचा दबाव होता. आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांकडे काम राहील, याची काळजी राष्ट्रवादीने घेतल्याची चर्चा होती. दुसरीकडे भाजपनेही आपल्याला प्रतिकूल रचना होणार नाही, यासाठी पदाधिकारी बारीक लक्ष ठेवून होते.
प्रारूप आराखडा तयार करताना आपल्या मनाप्रमाणे व पक्षाला फायदा होईल या पद्धतीने प्रभाग रचना करावी यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी तर थेट आयुक्तांच्या बंगल्यावर धाव घेऊन प्रभाग रचनेत बदल करावी अशी गळ घातली होती. ही प्रभाग रचना करताना मध्यवस्तीतील दोन प्रभाग कमी झाले आहेत. तसेच महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित असल्याचीही चर्चा महापालिकेत रंगली आहे.
आता या तयारीनंतर आराखडा हा नियमानुसार झाला आहे की नाही? चारचा प्रभाग असताना तीनचा प्रभाग व्यवस्थित केले आहे का? यासह इतर कायदेशीर बाबी तपासण्यासाठी सोमवारी (ता. १३) निवडणूक आयोगासमोर सादरीकरण केले जाणार आहे. या सादरीकरणामुळे प्रारूप आराखडा नागरिकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे.
प्रारूप आराखडा आयोगाला सादर केल्यापासून आता प्रभाग रचना कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप रचना तपासण्यासाठी सोमवारी सादरीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलविण्यात आले आहे. हे सादरीकरण करताना प्रभागात लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का? नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का ? तसेच एक सोसायटी, वस्ती, गाव एकाच प्रभागात आले आहे की ते तोडून विभागणी केली आहे, यादीची तपासणी केली जाईल. आवश्यक ते बदल आयोगाकडून पालिकेला सुचविले जातील, त्यानंतर काही दिवसांनी प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी जाहीर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.