Pune Lok Sabha Constituency: सर्वसामान्यांशी घनिष्ठ संबंध असलेले काँग्रेसचे निष्ठावंत मोहन जोशी

Mohan Joshi Pune Lok Sabha Constituency : पुण्यातील काँग्रेसची पक्ष संघटना सुरक्षित ठेवण्यात मोहन जोशी यांची महत्वाची भूमिका आहे.
Mohan Joshi
Mohan JoshiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : निस्वार्थ कार्य, समर्पण, निष्ठा यासाठी मोहन जोशी यांची ओळख पुण्यासह महाराष्ट्रात आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी आतापर्यंत मोहन जोशी यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरी भागात आजही कार्यकर्ते काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत.पुणे शहरातील प्रत्येक विभागासाठी कार्यक्रम आणि धोरणे राबवत त्यांनी कार्यकर्त्यांशी घट्ट नाते निर्माण केले आहे.

तरुण, अल्पसंख्याक, कामगार वर्ग, महिला आणि दलित समुदायात ते लोकप्रिय आहेत. मोहन जोशी यांचा प्रामाणिकपणा, साधेपणा आणि वैयक्तिक संपर्कासाठी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क प्रत्येकाला भावतो. सर्वसामान्यांत त्यांची ओळख जनतेचा माणूस अशीच आहे.प्रत्येकाची त्यांच्यावर गाढ श्रद्धा आणि निष्ठा आहे.

सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभवाने मोहन जोशी यांनी पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुण्यातील काँग्रेसची पक्ष संघटना सुरक्षित ठेवण्यात मोहन जोशी यांची भूमिका महत्वाची आहे. संधी मिळाल्यास भारताच्या संसदेत पुणे शहराचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची क्षमता आहे.

नाव (Name)

मोहन रामकृष्ण जोशी

जन्मतारीख (Birth date)

3 डिसेंबर 1956

शिक्षण (Education) :

दहावी उत्तीर्ण

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

मोहन जोशी यांचा जन्म सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1972 पासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले मोहन जोशी हे राजकीय क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना दहावीनंतर शिक्षण बंद करून काम सुरू करावे लागले. सुरुवातीला ते 1968 मध्ये गिरणी कामगार म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात वार्ताहराची नोकरी स्वीकारली. मराठी वर्तमानपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून काहीकाळ काम केले. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय कार्यात रस असल्याने त्यांचा राजकारणाकडील ओढा वाढला. मोहन जोशी यांच्या पत्नी गृहिणी आहेत तर मुलगा रोहित हा स्वतःचा व्यवसाय संभाळतो.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय, राजकारण

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

पुणे

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

काँग्रेस

Mohan Joshi
Muralidhar Mohol News : लोकसभेसाठी पुण्याचा उमेदवार कोण? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं...

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

मोहन जोशी यांनी आतापर्यंत दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ते एक टर्म विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. पत्रकार म्हणून काम केल्याने त्यांना पुणे शहराला भेडसावणारे महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न माहित होते. सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विविध कार्यक्रम राबवले. विचारसरणीने प्रभावित झाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1972-73 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करीत ते पुण्यातील काँग्रेस पक्षाचा कणा बनले.

1972 मध्ये ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1986 मध्ये तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांनी त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या प्रदेशाक्षपदाची धुरा सोपवली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 1997 ते 2004 या काळात झालेल्या लोकसभा, विधानसभा तसेच पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली. 1999 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2007 पासून 2013 पर्यंत त्यांनी विविध राज्यांत निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्याकडे 2005 मध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपद होते.

Mohan Joshi
Sunil Deodhar : ''...तर पुणे लोकसभा लढवायला मी तयार'' ; सुनील देवधरांचं सूचक विधान!

2009 मध्ये प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. 2008 ते 2014 दरम्यान ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात त्यांनी पुणे शहरच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत विकासकामे मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यापूर्वी 1999 मध्येही त्यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. पुणे मेट्रो प्रकल्प, HCMTR रिंग रोड, झोपडपट्टी पुनर्विकास धोरणे, म्हाडा गृहनिर्माण, पुण्यातील सीएनजी नेटवर्क.सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था, महाराष्ट्रासाठी रिक्षा ऑटो युनियन वेल्फेअर बोर्ड, फ्लायओव्हर्स, आणि अनेक विकासात्मक प्रकल्पांसह एलबीटी समस्या सोडविण्याचे काम केले आहे. त्याशिवाय विविध कार्यक्रम, प्रकल्प आणि धोरणांचा प्रचार, प्रसार केला आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

मोहन जोशी यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले. महात्मा गांधी यांचे स्वप्न असलेल्या हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून गरजूंना मदत केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाविरोधात आंदोलन केले होते. प्रवीण तोगडिया यांच्या दौऱ्यालाही विरोध दर्शवला होता.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोहन जोशी यांना गिरीश बापट यांच्याकडून पराभव स्वीकरावा लागला होता. बापट यांनी त्यांचा या निवडणुकीत तब्बल ३ लाख २४ हजार मतांनी पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

काँग्रेसकडून 2019 मध्ये मोहन जोशी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोहन जोशी यांना गिरीश बापट यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जोशी हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून गेल्या चार दशकांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. मात्र, काँग्रेसकडून प्रचार यंत्रणेचा प्रभावीपणे वापर केला गेला नाही. काँग्रेस नेते प्रचारात दिसले नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणावी तशी मदत झाली नाही, असे सांगितले जाते. भाजपच्या तुलनेत काँग्रेसची प्रचारयंत्रणा तोकडी होती. 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेने वातावरण पूर्ण भाजपमय झाले, त्याचा फायदा भाजपला झाला. या निवडणुकीत गिरीश बापट यांना 6 लाख 32 हजार 835 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मते मिळाली. या निवडणुकीत जोशी तब्बल ३ लाख २४ हजार मतांनी पराभूत झाले. त्याशिवाय 1999 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जोशी 2 लाख 12 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

मतदारसंघात फिरून कार्यकर्त्यांच्या सतत भेटीगाठी घेत असतात. कार्यकर्त्यांचे लग्नकार्य, उद्घाटन, सुख-दुःखात सहभागी होतात. मतदारसंघातील विकास कामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात मतदारसंघातील अडचणींचा व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीचा नियमित आढावा ते घेतात. सर्वांच्या अडचणी सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

जोशी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात असतात. पक्षाची ध्येयधोरण, नेत्यांची भाषणं, मेळावे याची माहिती ते सोशल मीडिया हॅंडलवरून देत असतात. याशिवाय पुणे शहरातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केल्या जातात. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांची वैयक्तिक ओळख आहे. नागरिकांशी असलेले मजबूत संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर लसीचा मुद्दा आणि त्यावरील राजकारण पेटले होते. पुण्यातही हेच चित्र पाहायला मिळत होते. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी पुण्यात लसीचा तुटवडा असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांवर बोचरी टीका केली. मात्र त्याला उत्तर देताना पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या काँग्रेस नेत्यांना ओळखतच नसल्याचे सांगत पलटवार केला होता. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत अनेक जणांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याने अनेक जणांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

काँग्रेस नेते कै.गुरुदास कामत.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

पक्षनिष्ठा हा मोहन जोशी यांचा सर्वात मोठा सकारात्मक मुद्दा म्हणावा लागेल. प्रत्येकाच्या सुःखात, दु:खात सहभागी होतात. तन-मन-धनाने त्याला मदत करणे ही त्यांची जमेची बाजू आहे. पुण्यात काँग्रेस पक्ष वाढविण्याचे श्रेयही त्यांना प्रामुख्याने दिले जाते. पुणे शहरातील प्रत्येक विभागासाठी कार्यक्रम आणि धोरणे राबविल्याने त्यांच्यासोबत घट्ट नाते निर्माण झाले आहे. तरुण, अल्पसंख्याक, कामगार वर्ग, महिला आणि दलित समुदायात ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि वैयक्तिक संपर्कासाठी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उच्च सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांची जनसामन्यांतील प्रतिमा चांगली आहे. मात्र, या सहानभुतीचे मतदानात रुपांतर करणे त्यांना शक्य झालेले नाही.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

इतर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यात मोहन जोशी यांना अपयश आले. त्यामुळे ही मंडळी प्रचारात हिरिरीने सहभागी झाली नाही. जोशी यांनी काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवरील संबंध वापरून उमेदवारी आणल्याने ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत, अशी ओळख ते निर्माण करू शकले नाहीत. यावेळी पुण्यातील लढत चुरशीची होणार अशीच चर्चा होती, मात्र काँग्रेसने घातलेला उमेदवारीचा घोळ तसेच तुल्यबळ उमेदवार न देता, निष्ठावंत असणाऱ्या मोहन जोशी यांना तिकीट दिले. मात्र जोशी बापटांसमोर तसे कडवे आव्हान उभे करण्यास तितकेसे यशस्वी झाले नाहीत. प्रचारयंत्रणेत काँग्रेस कार्यकर्ते न उतरल्याने त्याचा फटका त्यांना बसला. काँग्रेसचा झोपडपट्टी भागातील मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आलेल्या अपयशामुळे जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

दोन वेळा निवडणूक लढवली असल्याने जोशी यांना संपूर्ण मतदारसंघाची जाण आहे. त्याशिवाय मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत. दुसरा उमेदवार जरी दिला तरी पक्षाच्या आदेशाचे ते पालन करतील.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com