Pune Municipal Corporation : पालिका आयुक्तांचा हट्ट अन् कर्मचारी - अधिकाऱ्यांमध्येच जुंपली; आता अजितदादांकडे करणार तक्रार

Pune Municipal Corporation News : एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून पालिकेच्या दोन विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये वाद, आयुक्तांच्या हट्टामुळे हा वाद सुरू झाल्याने कर्मचारीवर्गात नाराजी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिकेचे प्रमुख म्हणून आयुक्तांकडे पाहिले जाते. काही अडचण आली तर कुटुंबप्रमुख म्हणून आयुक्त हे सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये असतो. मात्र पुणे महापालिकेत या विश्वासाला तडा गेला आहे. एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून सध्या पालिकेच्या दोन विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. हा वाद पालिका आयुक्तांच्या हट्टामुळे सुरू झाल्याने कर्मचारी आणि अधिकारीवर्गात चांगलीच नाराजी पसरली आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेच्या माध्यमातून जनवाडी, आशानगर या भागात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी आयोजिण्यात आला होता. या भागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या प्रयत्नातून या टाकीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये काही प्रमाणात अडचणी आल्यानंतरदेखील बहिरट यासाठी सतत पाठपुरावा करीत होते. या टाकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते आणि उपस्थितीत करावे, याचा ठराव पालिकेच्या स्थायी समिती तसेच मुख्य सभेत मान्य करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Municipal Corporation
Andhare On Rane : 'ये पब्लिक सब जानती है,' राज्यसभेची टर्म संपली म्हणून...; अंधारेंनी मंत्री राणेंना डिवचलं

या टाकीचे उद्घाटन करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यानंतर त्यामध्ये बहिरट यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी भाजपचे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या दबावाखाली महापालिका या टाकीचे उद्घाटन करीत असून हे बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप हे उद्योग करीत असून पालिकेने यापूर्वी झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न केल्यास काँग्रेस येथे आंदोलन करेल, असा इशारा आमदार धंगेकर यांनी दिला होता. मात्र त्यानंतरदेखील हा कार्यक्रम घेण्याचा हट्ट भाजपने कायम ठेवल्याने काँग्रेसने येथे आंदोलन केले.

त्यामध्ये वादावादी तसेच गोंधळ झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमात शिवीगाळदेखील करण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पालिकेत आंदोलन केले. नगरसचिव विभागाने आवश्यक तो प्रोटोकॉल न पाळल्याने हा गोंधळ झाल्याचा आरोप अभियंता संघाकडून करण्यात आला, तर या कार्यक्रमाचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या होत्या.

या कार्यक्रमाचे नियोजन झाल्यानंतर या टाकीबाबत यापूर्वी झालेल्या सर्व ठरावांची माहिती पालिका आयुक्त विक्रमकुमार यांना देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला, असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आयुक्त कार्यालयाला वारंवार सांगून त्यांनी यापूर्वी सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावांकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला. हट्टाने हा कार्यक्रम घेऊन पालिकेतील दोन विभागामधील अधिकाऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे काम आयुक्तांनी केले, अशी चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.

कार्यक्रमस्थळी आयुक्त फिरकलेच नाहीत!

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप (BJP) आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जगजाहीर होते. हा कार्यक्रम वादाचा असल्याने पालिकेचे प्रमुख म्हणून आयुक्त विक्रमकुमार यांनी तेथे आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र आयुक्त विक्रमकुमार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकलेदेखील नाहीत. या सर्व प्रकारांमुळे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. आयुक्तांच्या या वर्तनाची तक्रार थेट पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे करण्याची तयारीदेखील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Pune Municipal Corporation
MLA Ravindra Dhangekar : 'मला तुरुंगात टाकण्याचा...'; आमदार धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com