Pune Accident News in Marathi : कल्याणीनगर भागात झालेल्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात दररोज धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. या अपघात प्रकरणामध्ये आता 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना देखील पुणे पोलिसांकडून शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर गाडी आपणच चालवत होतो असा जबाब देण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरला धमकावून डांबून ठेवण्यात आले, असा आरोप या आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल याच्यावरती ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आता आणखी काही खुलासे बाहेर आले असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली आहे.
आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल याला अटक केल्यानंतर याची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये माहिती देताना अमितेश कुमार म्हणाले,अपघाताच्या (Accident) रात्री ड्रायव्हरवर या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वतःवरती घ्यावी यासाठी दबाव आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ड्रायव्हरने पहिल्यांदा पोलिसांमध्ये येऊन आपणच गाडी चालवत असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी (Police) केलेल्या तपासामध्ये मात्र अल्पवयीन आरोपी गाडी चालवत असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस स्टेशन मधून ड्रायव्हरला सोडल्यानंतर सुरेंद्रकुमार अगरवाल याने या ड्रायव्हरला जबरदस्तीने आपल्या घरी नेले, तेथे त्याचा मोबाईल काढून घेतला. नंतर त्याला एका खोलीमध्ये दाबून ठेवले. कोणाशी बोलायचे नाही, कुठेही जायचे नाही आणि आम्ही सांगू तसेच पोलिसांना स्टेटमेंट द्यायचे असा दबाव अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरवर आणल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ड्रायव्हरच्या कुटुंबीयांनी त्या ठिकाणी येऊन या ड्रायव्हरची सुटका केल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांच्या तपासामध्ये ड्रायव्हरने याचा खुलासा केला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पुरावा नष्ठ करणे, धमकावणे तसेच अपहरण करणे या गुन्ह्याखाली सुरेंद्रकुमार अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांचाही यामध्ये सहभाग असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ड्रायव्हरला तू मागशील तेवढी रक्कम देऊ तुला हवे ते देऊ असे देखील आमिष या ड्रायव्हरला दाखवले होते, असे आयुक्तांनी सांगितले.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.