
Pune News, 03 Aug : मालेगाव बॉम्बस्फोटा संदर्भात आलेल्या कोर्टाच्या निकालानंतर हिंदुत्ववादी नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच यवत येथे दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
यानंतर राज्यातील सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वातावरण दूषित करण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हिंदुत्ववादी नेत्यांना काही सवाल केले आहेत.
रोहित पवार म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा, स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी नथुराम गोडसे असो वा पहलगाम हल्ल्यातले आतंकवादी असो हे सगळे आतंकवाद्यांचे मूळ अतिकडव्या विचारात आहे.
आतंकवादाला कोणताही रंग नसतो तर केवळ अती कडवा विचार हाच आतंकवादाचा आधार असतो, हे आतंकवादाला राजकीय रंग देऊ पाहणाऱ्या राजकीय नाटकी पेंटर्सनी लक्षात घ्यायला हवे, अशी टीका रोहित पवारांनी केली.
हिंदू धर्माची परंपरा नेहमीच समतेच्या, मानवतेच्या आणि संतांच्या विचाराला पुरस्कृत करत आली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत परंपरेच्या मानवतावादी समाजाला पुढे नेऊन विचारांना विरोध करणाऱ्या मनुस्मृतीवर आधारलेली मनुवादी विचारांची परंपरा हिंदू धर्माचा भाग होऊच शकत नाही.
धर्माची शिकवण समाजाला पुढे नेणारी असते, मागे खेचणारी असूच शकत नाही. आम्ही मनुस्मृती कालही जाळली आजही जाळत आहोत आणि उद्या देखील जाळू, असंही रोहित पवार म्हणाले. तर आज देशात सर्वत्र शेतकरी अडचणीत आहे, महिला सुरक्षेचा, बेरोजगारिचा विषय ज्वलंत आहे.
या समस्याचा सामना सर्व धर्मियांप्रमाणे हिंदूंना देखील आहेच ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदू धर्मीय या अडचणीचा सामना करत असताना यासाठी आवाज उठवण्याचा विचार तथाकथित हिंदुत्ववादी नेते का करत नाहीत? हिंदू धर्मीय शेतकरी करत असलेल्या आत्महत्या यांना दिसत नाही का?
नोकरीसाठी वणवण फिरणारा हिंदू युवा यांना दिसत नाही का? असा प्रश्न त्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांना केला. अति कडवे विचार मांडणारे बेगडी प्रेम दाखवणारे नेते मग ते कोणत्याही धर्माचे असोत ते केवळ राजकीय पोळ्या शेकतात हेच खरं वास्तव आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.