लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात विधानसभेची जोरात तयारी सुरु झाली आहे. आगामी विधानसभेसाठी जनमताचा कानोसा घेणारे सर्वेक्षण सकाळ माध्यम समुहाने (sakal survey 2024) केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीच्या भल्या भल्या उमेदवारांना चितपट केले. महायुतीत अजित पवार सहभागी झाल्याने कुणाला फायदा झाला, कुणाला तोटा झाला, यावर मतदारांनी कल दिला आहे. मतदारांची आघाडी का महायुतीला पसंती दिली आहे, हे सर्वेक्षणात समोर आले आहे.
सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सात लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने चार मतदारसंघांत विजयाची पताका फडकावली. महायुतीला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येथे मोठा फटका बसला. पक्षफुटीनंतर बहुतांश आमदार, दुसऱ्या फळीतील नेते अजित पवार यांच्यासमवेत गेले. अजित पवार सोडून राष्ट्रवादी काय असणार, असा प्रश्न उपस्थित झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (Sharad Pawar)विधानसभेच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरु आहे. त्यांच्याकडे सध्या तीन जिल्ह्यांत चार आमदार आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी ते काय पावले उचलणार याकडे राज्याचे लक्ष आहे. त्यांच्या पक्षातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा गद्दारांना थारा नको अशीही भावना पक्षात जोर धरत आहे. दोन्ही राष्ट्रवादीसाठी आगामी निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने येणार आहेत. या तुल्यबळ मुकाबल्यात अजित पवारांपुढे आमदारांची संख्या कायम राखण्याचे खडतर आव्हान आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नऊ आमदार आहेत. नगरमध्ये दोन व साताऱ्यात दोन आमदार आहे. ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात तब्बल २५ टक्के मतदारांनी राष्ट्र्वादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पसंती दिली आहे. शरद पवार यांना असलेली सहानुभूती व लोकप्रियता कायम असल्याचे हे द्योतक आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातून डॉ अमोल कोल्हे , नीलेश लंके यांच्या रुपात नवीन स्थानिक नेतृत्व आकार घेतला आहे. अशावेळी घरवापसीचे दरवाजे उघडणे अनेकांसाठी अवघड तर होईलच शिवाय निवडणुकीतही मोठे आव्हान अजित पवारांसमोर असेल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसकडे पारंपारिक मतपेढी आहे. सध्या पुणे, नगर (प्रत्येकी ३) तर साताऱ्यात एक असे सात आमदार आहेत. लोकसभेला देशात मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारे आहे. बदलत्या राजकीय समीकरणात ही संख्या वाढविण्याची संधी पक्षाकडे आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपचे ८ तर साताऱ्यामध्ये दोन, नगरमध्ये तीन आमदार आहेत. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडून पक्षासाठी या भागात सहकार क्षेत्राची मोट बांधण्याची अपेक्षा असेल. योगेश टिळेकर (माळी ओबीसी) आणि अमित गोरखे (मातंग) या तरुण नेत्यांना विधानपरिषदेवर संधी देत पक्षाने जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा एकही आमदार नाही. मात्र दोन्ही शिवसेनेकडे प्रत्येकी एक खासदार आहे. त्या जोरावर दोन्ही पक्षांनी जागावाटपात जास्त जागा पदरात पाडून घेतल्यास ताकद वाढविता येणार आहे. एकनाथ शिंदे उमेदवारांमागे भरपूर ताकद उभी करतात हे लोकसभेत दिसले पण विधानसभेला शिंदे यांना अशीच ताकद महायुतीमागे उभी करावी लागेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.