सोमेश्वरनगर : मी जिवंत असेपर्यंत मी व माझा गट अजितदादा पवारांसोबत (Ajit Pawar) कायमस्वरूपी राहणार, अशा भावना शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे (Satish Kakde) यांनी व्यक्त केल्या. तसेच जिल्हा बँकेला भाजपच्या (BJP) निवडून आलेल्या उमेदवाराला बारामती तालुक्यातून राष्ट्रवादीच्याच (NCP) सतरा लोकांनी मते दिली. त्या मतदारसंघात आमच्याकडे एकच मत होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तर राष्ट्रवादीचे नेते किरण गुजर यांनी, सतीश काकडे यांनी जिल्हा बँकेस माघार घेतली यामुळे १९९१ नंतर अजितदादा जिल्हा बँकेवर प्रथमच बिनविरोध गेले. अजितदादा-सतीश काकडे-किरण गुजर हे वेगळे समीकरण आहे. लोकांनी जास्त खोलात जाऊ नये, अशी गुगलीही टाकली.
नीरा (ता. पुरंदर) येथे ज्युबिलंट कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्युबिलंट कंपनीकडून युनियनचे अध्यक्ष म्हणून मिळालेल्या मानधनातून काकडे यांनी कामगारांचा सपत्नीक सत्कार करत सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा करंडा अशा भेटवस्तू बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते दिल्या. या कार्यक्रमात गुजर यांनी, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे अजितदादा बिनविरोध बँकेवर गेले. यापूर्वी १९९१ पासून काकडे गटाचा उमेदवार अजितदादांच्या विरोधात उभा असायचा. यावेळी काकडे यांनी सहकार्य केले. अजितदादा पवार, सतीश काकडे व किरण गुजर हे एक वेगळेच समीकरण आहे, असे ते म्हणाले.
काकडे म्हणाले, मी अजितदादा पवार व सुनेत्राताई पवार यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. त्यासाठी माझी कुठलीही अपेक्षा नाही. जिल्हा बँकेला मी अर्ज भरला होता कारण अजितदादा बोलवतील हे मला माहित होते. मला एकरकमी एफआरपी मागायची होती. त्यांच्याशी भेटल्यावर मी त्यांना जिल्हा बँकेत तुमच्यासारखा माणूस पाहिजे. अन्य जिल्ह्यातील जिल्हा बँकांची अवस्था वाईट आहे. पुणे जिल्हा बँक चांगली चालली असून शेतकरी, कारखाने यांचा आधार बनली आहे. ती टिकून राहण्यासाठी, शिस्त कायम राहण्यासाठी अजितदादा बँकेत असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी दादांना बँकेत राहण्याचा आग्रह केला, असे उघडपणे सांगितले. ज्युबिलंट युनियनच्या वादात आपणास अजित पवार, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सहकार्य झाल्याचे आणि त्यामुळे कामगारांचा ऐंशी टक्के त्रास कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या आशा बुचके यांचे काम केले
जिल्हा बँकेत भाजपचा एक उमेदवार (प्रदीप कंद) निवडून आला. त्यास बारामतीतूनही मते पडली. त्या मतदारसंघात माझ्या जवळचे फक्त एक मत होते. ते राष्ट्रवादीलाच गेले यात शंका नाही. उलट राष्ट्रवादीचीच सतरा मते फुटली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके यांचे मात्र जिल्हा बँकेत आपण काम जाहीरपणे केले आणि ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनाही माहित आहे, असेही काकडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.