
Raj Thackeray News : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. तर शाईफेक करणाऱ्या युवकावर ३०७ कलमासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणामध्ये मनसे (NCP) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यस्थी केली आहे.
राज ठाकरे यांना या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून या प्रकरणामध्ये मध्यस्थी करत त्या ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली. तसेच शाईफेक करणाऱ्या युवकावर लावण्यात आलेला ३०७ कलमही शिथिल करण्याची विनंती केली.
राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने शाईफेक करणाऱ्या युवकावरील ३०७ कलम शिथिल करण्यास व ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व चंद्रकांत पाटील यांनी होकार दिला असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
राज ठाकरे प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हणाले?
''लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण 'मनसे स्टाईल'ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत''.
''मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात. असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली.
एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल''.
''पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यातच आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली. मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे, आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो''.
''ह्याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्यावतीने ह्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर ह्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. म्हणून मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो, त्यांच्या कानावर ह्या सगळ्यांचं म्हणणं घातलं''.
''त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत ३०७ सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवली. तसंच माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं, अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला. ह्यासाठी दोघांचे मनापासून आभार''.
''पण माझी महाराष्ट्रातील तमाम राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निषेध जरूर नोंदवा पण सवंग प्रसिद्धीसाठी असं काहीही करू नका, जे एखाद्याच्या जीवावर बेतेल. ह्या प्रकरणातून इतका धडा जरी सगळ्यांनी घेतला तरी पुरेसं आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे, त्याचा दाखला आज ह्या दोन नेत्यांनी दाखवला, आता इतरांनी पण तो कृतीतून दाखवावा हीच अपेक्षा''. असं राज ठाकरे हे प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.