
Pune News : व्यवहार आणि व्यवसायातील मला फार कमी समजते. पण प्रतापराव पवार हातात घेतील तो व्यवसाय यशस्वीच करतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतापरावांचे कौतुक केले. कॉलेज काळात 'नेता' नावाचे साप्ताहिक तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीने एक मासिक काढून व्यवसाय करण्याचा आपण प्रयत्न केला होता. मात्र या दोघांचा दुसरा अंक निघालाच नाही, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.
निमित्त होते ते सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार लिखित ‘अनुभवें आले’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे! यामध्ये ते बोलत होते. सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी शरद पवार, प्रतापराव पवार आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस.के.जैन यांच्याशी संवाद साधला. यामध्ये तिन्ही मान्यवरांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रेरणा, त्याबद्दल असलेली आत्मीयता, तसेच संस्था बांधणीचे सूत्र उलगडले. (Prataprao Pawar book Publishing program)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्वयंसेवी संस्था हा महाराष्ट्राचा ठेवा असून राज्यात आपत्ती आल्यावर समाजसेवी संस्था आणि सर्वसामान्य लोक भरभरून मदत करतात. अगदी निस्वार्थपणे ते सेवाकार्यात स्वतःला वाहून घेतात, असेही शरद पवार(Sharad Pawar) यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आमच्या वैयक्तिक तसेच सामाजिक कार्याचा पाया हा आईचे संस्कार असल्याचे प्रतापराव पवार(Prataprao Pawar) यांनी सांगितले. ते म्हणाले, सामाजिक कार्यात निःस्वार्थपणे कामे करणारी लोक बघत गेलो. त्यामुळे नकळतच एक नैतिकतेची भिंत माझ्याभोवती उभी राहिली. व्यावसायिक यशस्वीतेपेक्षा संस्थेचा मानवी चेहरा आवश्यक आहे. आत्मीयता, विश्वास आणि सांघिक भावनेने माझे सामाजिक कार्य विस्तारत गेले.
'अनुभवें आले' या लेखमालेतून प्रेरणा मिळाल्याचे एस.के.जैन यांनी सांगितले. लेखांमधून वास्तविकतेच्या आधारावर लोकशिक्षण मिळाले. शैक्षणिक संस्था चालविताना काय गोष्टी करायला पाहिजे हे प्रतापरावांच्या लिखाणातून कळाल्याचेही जैन म्हणाले. तर या पुस्तकाच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी आणि प्रस्तावना संपादक सम्राट फडणीस यांनी स्पष्ट केली.
मनात आग आणि हृदयात प्रेरणा असलेल्या लोकांमध्ये प्रचंड क्षमता असते. स्वतःचे काम करत समाजासाठी योगदान देत रहावे. त्याचा समाजाला नक्की उपयोग होईल. ज्याला शक्य नाही त्याने आर्थिक रूपाने तरी मदत करावी, असे आवाहन प्रतापराव पवार यांनी नव्या पिढीला केले. सामाजिक कार्यासाठी आपला मनोनिग्रह असेल तर वेळ निश्चित मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.