शिक्रापूर (जि. पुणे) : शिवसेना (Shivsena) उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे. ‘मातोश्री’वरुन (Matoshri) विचारणा झाल्यास आढळराव-पाटील यांना शिरुरमधूनच उमेदवारी द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवावी आणि आढळराव पाटलांना शिरुरमधून उमेदवारी देण्यात यावी, असे पत्र वरिष्ठांना दिल्याचे शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशिद यांनी स्पष्ट केले. (Shiv Sainiks oppose decision of seniors to send Shivajirao Adhalrao Patil to Pune)
दोन दिवसांपूर्वी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासमोर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत सांगण्यात आले. मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानून आढळराव यांनी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ‘मातोश्री’वरील बैठकीत घेण्यात आलेल्या भूमिकेबद्दल शिवसैनिकांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यामागे राष्ट्रवादीचे असल्याचे शिवसैनिक खासगीत आरोप करत आहेत. त्यामुळे आढळरावांना शिरुरमधूनच उमेदवारी द्यावी, यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले.
वरिष्ठांकडून विचारले तर काय ते सांगू : जिल्हाप्रमुख
मातोश्रीवरील बैठकीत आढळराव पाटील यांना जे सांगण्यात आले, त्याबद्दल पक्षसंघटना म्हणून आमचे मत कोणीही जाणून घेतलेले नाही. ज्या मतदार संघात आढळरावांचा संपर्क आहे. मतदारांशी जिथे नाळ जोडलेली आहे. जिथे पक्ष संघटना मजबुतीने त्यांनी बांधलेली आहे आणि ज्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत, तो मतदारसंघ सोडून पुण्यात का जायचे? आमच्या मतदारसंघातील सामान्य शिवसैनिक आणि संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी हेही पुण्याच्या उमेदवारीबाबत आचंबित झालेले आहेत. वरिष्ठांकडून मला विचारणा झाल्यास मी खुलासेवार बोलणार आहे. तसेच, वस्तुस्थितीचा अहवालही सादर करणार आहे, असे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने पुण्यातून लढावे आणि शिरूर आढळरावांना सोडावा
आपली महा विकास आघाडी आहे, हे राष्ट्रवादीने लक्षात घ्यावे. महाआघाडी नसताना राष्ट्रवादीकडून २०१९ मध्ये शिवसेनेचा पराभव झाला आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीला आमची गरज असेल तर आता शिरुरची जागा त्यांनी आढळराव पाटलांसाठी सोडावी आणि त्यांनी पुण्यात आपला उमेदवार उभा करावा, त्यांना आम्ही पुण्यात मदत करु. तसा पत्रव्यवहार आपण वरिष्ठांना केल्याचेही काशिद यांनी सांगितले.
...तर जनआंदोलन उभारू : जयदीप ताठे
शिरूर मतदारसंघाबाबत निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती विचारात घ्यायला हवी होती. सध्याच्या घडामोडीमुळे शिवसैनिक आधीच संतप्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आढळराव-पाटील यांचा कोणताही संपर्क नसलेल्या पुण्यातील उमेदवारीबाबत भाष्य करणे, हे केवळ आढळराव-पाटलांवर अन्याय करण्यासारखे नाही तर संपूर्ण शिरुर मतदार संघावर अन्याय करण्यासारखे आहे. असे काही निर्णय घेतले गेल्यास आम्ही जनआंदोलन उभे करू , असे शिवसेनेचे शिरूर विभागप्रमुख जदीप ताठे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.