महाय़ुतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने पेच निर्माण झालेल्या मावळची जागा अखेर शिवसेनेलाच सुटली. तेथे पुन्हा श्रीरंग बारणेच हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. आता या मतदारसंघातून बारणे खासदारकीची हॅटट्रिकच करतात की ही संधी त्यांच्याकडून हुकते? हे पाहावे लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मावळात आपल्याला धनुष्यबाण चालवायचे आहे, असे मंचर येथील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले होते. तसेच महायुतीचे उमेदवार 28 तारखेला जाहीर होणार असल्याची घोषणाही त्यांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले त्यांचे कट्टर समर्थक मावळचे आमदार सुनील शेळकेंचीही भूमिका मवाळ झाली होती.
अजितदादा म्हणतील तसं, त्यांच्य़ा आदेशाचे आणि युतीधर्माचे पालन करू, जो उमेदवार असेल, त्याचे खंबीरपणे काम करूअसे ते बारणेंची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेने आपली आठ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली.रामटेक मतदारसंघाचा अपवाद वगळता बाकीच्या सर्व जागांवर बारणेंसह तेथील खासदारांनाच रिपीट करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारणे हे मावळमधून 2014 आणि 2019 असे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. हा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हा म्हणजे 2009ला तेथील पहिले खासदार हे शिवसेनेचेच गजानन बाबर होते. तर, मावळ विधानसभा मतदारसंघात सुद्धा अद्याप कुणाचीही आमदारकीची हॅटट्रिक झालेली नाही. त्यामुळे बारणेंची ती खासदारकीची झाली, तर तो या मतदारसंघातील विक्रम होणार आहे.
शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी पक्षाची आठ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जाहीर केली. त्यात बारणेंसह राहूल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), प्रताप जाधव (बुलढाणा), हेमंत पाटील (हिंगोली) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) या विद्यमान खासदारांना त्यांच्याच जागेवर पुन्हा रिपीट करण्यात आले आहे.
केवळ रामटेक या राखीव जागी कॉंग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना संधी देण्यात आली आहे. तेथील खासदार कृपाल तुमाने यांचे तिकिट कापण्यात आले आहे. भाजपच्या पाहणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना तेथे उमेदवारी न देण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, शिर्डी शिवसेनेला मिळाल्याने आरपीआय़चा त्या जागेवरील दावा गेला असून त्यांना एकही लोकसभेची जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.