Pune News : विधानसभा निवडणुक जाहिर झाल्यापासून, महाविकास आघाडीच्या विविध मतदारसंघातील इच्छुकांची संख्या वाढल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट (ShivsenaUBT) जुन्नरच्या पारंपारिक मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेचा मोठा संघर्ष सुरू झाला आहे.
हा संघर्ष आता निर्वाणीच्या इशाऱ्यापर्यंत पोहचला असून, कोणत्याही तडजोडीविना जुन्नर आम्हाला द्या असा अन्यथा शिवसैनिक पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शुक्रवारी (ता.18) 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत झाल्याचे समोर येत आहे.
जुन्नर हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि दिवंगत सावळराम बुवा दांगट यांचे घनिष्ठ संबंध होते. सामना वृत्तपत्र आणि मार्मिक मासिकासाठी मोठे अर्थसहाय्य दांगट यांनी बाळासाहेबांना केले होते. याचा दाखला संजय राऊत यांनी निर्माता असलेल्या बाळकडू चित्रपटात दिला आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांची उंब्रज गावात बैलगाडीवरून काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती.
शिवसेनेने बाळासाहेब दांगट यांच्या माध्यमातून दोनवेळा विजय संपादन केला होता. मात्र, नंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेेचे उमेदवार कमी मताधिक्याने पराभूत झाले. तर लोकसभेला शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून तीनवेळा खासदारकी शिवसेनेकडे होती.
दरम्यान, शिवसेना फुटीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (NcpSP) चे अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यात शिवसेनेच्या सुमारे 52 हजार मतांचा समावेश होता. यामुळे शिवसेनेने जुन्नर मतदारसंघावर प्रबळ दावा केला असून, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे हे प्रबळ उमेदवार म्हणून समोर येत आहे.
शिवसेना फुटीनंतर हक्काच्या जुन्नर मतदारसंघातून धनुष्यबाण आणि आता मशाल मतदान मशिनवरून गायब झाल्याने शिवसेनेचा हक्काचा मतदार दुरावला जाऊन,त्याचा फटका आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसणार आहे. यामुळे सतत दुसऱ्यांची पालखी वाहणार नाही, अशी भावना शिवसैनिकांची झाली आहे.
आम्ही लोकसभेला अमोल कोल्हे यांचे प्रामाणिक काम केेले आहे, आता त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आमचे शिवसेनेचे मशाल चिन्हाचे प्रामाणिक काम करावे. आणि कोणत्याही तडजोडीविना जुन्नर आम्हाला सोडावे असा इशारा दिला आहे.
दरम्यान शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली सभा जुन्नरला घेण्याचा आग्रह सुरू केला आहे. पहिला भगवा शिवनेरीवर मग विधानसभेवर अशी घोषणा देण्यास सुरूवात केली आहे. याबाबत तालुका शिवसेनेने 22 ऑक्टोबर रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केल्याचे समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.