Pimpri-Chinchwad News : मराठा आरक्षण आंदोलनाचा समाजाचा रेटा एवढा वाढला, की त्यासाठी मराठा आमदारांनी कालपासून मंत्रालयात आंदोलन सुरू केले. त्यात मावळचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) सुनील शेळकेंचा (Sunil Shelke) रुद्रावतार आज (ता.१) पाहायला मिळाला. त्यानंतर आता ते अधिक आक्रमक झाले असून, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणत्याही प्रकारची चालढकल राज्य सरकारने आता केल्यास आमदारकीचाच नाही, तर पक्षाचाही राजीनामा देईल, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकार व आपल्या पक्षालाही दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
समाजाचा रेटा वाढल्याने आरक्षणासाठी आता मराठा आमदार, खासदार राजीनामे देऊ लागले आहेत. आज, तर आमदारांनी मंत्रालयाला प्रतिकात्मक टाळे ठोको आंदोलन करीत मंत्रालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी शेळकेंचा रुद्रावतार दिसला. पोलिसी बळाचा निषेध करीत राज्य सरकारला घरचा आहेर त्यांनी दिला. त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले.
शांततापूर्ण आंदोलन केले, तरी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन करण्यापासून रोखले, याबद्दल संताप व्यक्त करीत कितीही वेळा असे रोखले, तरी मी परत परत आंदोलन करेल, असा इशारा आमदार शेळकेंनी नंतर दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी यापूर्वीच आपले दौरे आणि कार्यक्रम थांबवले आहेत. त्यानंतर आज त्यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला. मराठा आरक्षणाची मागणी मुदतीत मार्गी लागेल, असे वाटले होते. त्यासाठी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असल्याने काळजी नव्हती. परंतु मुदतीत हा प्रश्न सुटला, तर नाही, उग्र झाला, आंदोलन चिघळले. त्यामुळे मला ठोस भूमिका घेणे भाग पडले, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाला विधानसभेतील सर्व आमदार पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त करीत याप्रश्नी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी शेळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आज केली. याप्रश्नी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी ते मागे घ्यावे, अशी कळकळीची विनंती समाजातील तरुण, तरुणी, वडीलधारी मंडळी अर्थात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांनी केली. तसेच, जाळपोळ, तोडफोड, सरकारी अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहनही त्यांनी समाजाला केले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.