
पिंपरी : अकरा महिन्यानंतर कामगार नेते डॉ. कैलास कदम (Kailash Kadam) हे या महिन्यात कॉंग्रेसचे (Congress) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर लगेचच पक्षात इनकमिंग सुरु झाले. भाजप, (BJP) शेकापसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 25 ऑक्टोबर) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात शहरातील सत्तेत असलेल्या भाजपचा एक पदाधिकारी आहे, हे विशेष. त्यामुळे शहरात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या कॉंग्रेसचे खाते आगामी महापालिका निवडणुकीत (PCMC Election 2022) उघडण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या पालिका निवडणुकीच्या वेळी २०१७ मध्ये कॉंग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर, त्यांचा एकही उमेदवार त्यावेळी निवडून आला नाही. त्यामुळे पालिकेत त्यांची पाटी कोरीच राहिली. दरम्यान, सचिन साठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी ७ ऑक्टोबर 2021 ला कदम यांची नियुक्ती झाली. त्यानंतर या महिन्यातच भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, शेकापच्या महिला शहर अध्यक्षा छाया देसले, रॅायल फांऊडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी नांगरे, ख्रिश्चन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पठारे यांनी आपल्या समर्थकांसहित काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला.
कॉंग्रेसची विचारधाराच या काळात देशाला सांभाळू शकते. तिच्यावर देशातील सर्व धर्मीयांचा तसेच, सर्वसामान्यांचा विश्वास आहे. म्हणून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जगताप यांनी सांगितले. तर, सद्यस्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे, वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि इतरही अनेक सामाजिक समस्यांना कारण भाजपचे धोरण आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या समतावादी विचारांमुळे या पक्षात आल्याचे देसले म्हणाल्या. प्रवेश केलेल्यांचा मानसन्मान राखला जाईल, असा शब्द कदम यांनी यावेळी दिला. तसेच, त्यांना संघटनेत योग्य स्थान देऊन निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिपंरी चिचंवड काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एस सी विभागाचे शहराध्यक्ष बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कदम यांनी शहरातील कंत्राटी सफाई कामगारांनाही बोनस देण्याची मागणी पिंपरी पालिकेकडे सोमवारी केली. हे कंत्राटी कामगार वगळता इतरांना पालिकेने घसघशीत बोनस नुकताच जाहीर केला आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत पुरेसा मोबदलाही मिळत नाही. घंटागाडी कामगारांना ४० हजार दिवाळी बोनस स्थायी समितीने मंजूर केला. पण पालिकेने कंत्राटी कामगारांना त्यापासून वंचित ठेवले असून हे अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले. त्यांना बोनस मिळावा, म्हणून अतिरिक्त पालिका आयुक्त उल्हास जगताप यांच्याशी कदम यांनी आज चर्चा झाली. यासंदर्भात आय़ुक्त राजेश पाटील यांनाही ते भेटणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.